राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा
क्रीडा संकुलाचा पांढरा हत्ती पोसण्यासाठी महाराष्ट्रात शासनाच्या मालकीच्या असलेल्या स्टेडियम्सकरिता भरमसाट शुल्क आकारले जात असते. सुरतमध्ये मात्र राष्ट्रकुल स्पर्धेसाठी स्थानिक शासनाने एकही पैसा न घेता दीनदयाळ उपाध्याय स्टेडियम उपलब्ध केले आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळही दिले आहे. या स्पर्धेसाठी शासनाने २० कोटी रुपये खर्च करीत उपाध्याय स्टेडियमला जागतिक दर्जेच्या क्रीडा संकुलासारखे स्वरूप दिले आहे. ४ डिसेंबर रोजी या नूतनीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्पर्धा संयोजकांकडे त्याचा ताबा देण्यात आला. २२ डिसेंबपर्यंत हे स्टेडियम टेबल टेनिस संयोजकांकडे राहणार आहे. हे स्टेडियम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अल्पदरात किंवा विनाशुल्क द्यावे, अशी विनंती गुजरात टेबल टेनिस असोसिएशनने सुरतच्या महानगरपालिकेला केली होती. ही विनंती मान्य करीत त्यांनी स्टेडियम व त्यामधील सुविधा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनानेही एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही स्पर्धेसाठी दिली आहे. महाराष्ट्रातील शासकीय क्रीडा सुविधांकरिता स्पर्धा संयोजकांकडून नियमित शुल्क आकारले जात असते. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत बॉक्सिंग हॉलमध्ये टेबल टेनिस सामने आयोजित करण्यासाठी साधारणपणे एका दिवसाकरिता चार हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. वातानुकूलित सेवांकरिता वेगळे शुल्क मोजावे लागते. तसेच विद्युत पुरवठय़ाकरिता आणखी खर्च करावा लागतो. महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा खेळाडूंकरिता विनाशुल्क किंवा अल्पदरात दिल्या जाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेसह विविध खेळांच्या राज्य संघटनांकडून केली जात असते. मात्र अनेक वर्षे या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही.
महिलांमध्ये भारत उपांत्य फेरीत
सुरत : भारतीय महिलांनी लागोपाठ दोन सामने जिंकून दीनदयाळ उपाध्याय स्टेडियम येथे सुरु असलेल्या २०व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात भारताने उत्तर आर्यलडला ३-० असे हरविले व पाठोपाठ त्यांनी श्रीलंकेवर ३-० अशी मात करीत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.
भारताने महिलांच्या दुसऱ्या फेरीतील अव्वल साखळी पद्धतीच्या पहिल्या लढतीत वेल्स संघावर ३-० अशी मात केली. पाठोपाठ त्यांनी सायप्रस संघाचा ३-० असा पराभव केला. पुरुष गटात भारताने फेरीतील पहिल्या साखळी लढतीत उत्तर आर्यलडवर ३-० असा सफाईदार विजय मिळविला. दुपारच्या सत्रात त्यांनी श्रीलंकेला असे नमविले.
या स्पर्धेत आतापर्यंत भारतास अनुकुल कार्यक्रमपत्रिका लाभली आहे. पहिल्या फेरीपाठोपाठ दुसऱ्या फेरीतील साखळी गटातही भारतासाठी सोपी परिक्षाच होती. पुरुषांच्या सामन्यात आर्यलडविरुद्ध भारताच्या सौम्यजित घोष याने झ्ॉक विल्सन याला ११-५, ११-६, ११-४ असे सहज हरविताना काउंटर अॅटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. पाठोपाठ अँन्थोनी अंमलराजने अॅश्ले रॉबिन्सनवर ११-१३, ११-४, ११-७, ११ अशी मात केली. अँन्थोनी याला थोडासा संघर्ष करावा लागला. त्या तुलनेत साथियन गुणशेखरनने ओवेन कॅथकार्ट या तेरा वर्षीय खेळाडूचा ११-५, ११-३, ११-४ असा धुव्वा उडविला. ओवेन हा या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या संभाव्य प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीचा बारकाईने अभ्यास केला आहे याचाच प्रत्यय येथे दिसून आला. भारतीय खेळाडूंच्या आक्रमक फटक्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महिलांच्या पहिल्या लढतीत वेल्सविरुद्ध भारताच्या मौमा दास हिने मेगान फिलीप्स हिला ९-११, १२-१०, ११-६, ११-३ असे हरविले. मनिका बात्रा हिने चालरेटी कॅरी हिचा ११-७, ११-८, ११-८ असा पराभव करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली.
शामिनी कुमारेसन हिने चोलेई थॉमस हिच्यावर ११-९, १०-१२, ११-४, ११-२ अशी मात करीत संघास ३-० अशी विजयश्री मिळवून दिली. मौमा व शामिनी या दोन्ही खेळाडूंना विजय मिळविताना थोडेसे झुंजावे लागले. अर्थात उपांत्य फेरीसाठी त्यांना एक प्रकारे या लढतींद्वारे सरावाचीच संधी मिळाली.
तापीच्या तीरावरुन सिंगापूरचे वेगळेपण
राष्ट्रकुल देशांमधील टेबल टेनिस क्षेत्रात सिंगापूरचा दबदबा मानला जातो. सुरतमध्येही त्याची झलक पाहायला मिळत आहे. जेव्हा सामना सुरू असताना विश्रांतीच्या वेळी त्यांचा खेळाडू प्रशिक्षकाबरोबर चर्चा करतो, तेव्हा त्याचे सर्व सहकारी उभे राहून प्रशिक्षकांच्या सूचना बारकाईने ऐकत असतात. तसेच त्यांच्या खेळाडूंच्या सामन्याचे व्हिडीओद्वारे चित्रीकरण केले जात असते व सामना संपल्यानंतर या व्हिडीओचे निरीक्षण केले जात असते.
आजोळी आल्याचीच दानिशाची भावना
दक्षिण आफ्रिकेच्या संघात दानिशा पटेल या भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश आहे. तिचे आजोबा गुजरातमधीलच नवसारी येथील रहिवासी होते. दानिशाचे आई-वडिलांनी दक्षिण आफ्रिकेत नोकरी स्वीकारल्यानंतर हे सर्व कुटुंबीय तेथेच स्थायिक झाले आहे. दानिशाच्या वडिलांना टेबल टेनिसची आवड असल्यामुळे तिला या खेळासाठी प्रोत्साहन मिळाले. नवसारी येथे सध्या तिचे कोणीही नातेवाईक राहत नाहीत, तरीपण वेळ मिळाला तर ती आजोळच्या गावाला भेट देणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आजोळच्या गावाजवळ होत असल्यामुळे ती येथे येण्यासाठी खूप उत्सुक झाली होती. संयोजकांनी ती भारतीय असल्याची घोषणा ध्वनिक्षेपकाद्वारे केल्यानंतर प्रेक्षकांनी दानिशाच्या नावाचा जल्लोश केला. त्या वेळी हात उंचावत तिने या प्रेक्षकांचे आभार मानले. काही मुला-मुलींनी तिची स्वाक्षरीही घेतली.