राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा
क्रीडा संकुलाचा पांढरा हत्ती पोसण्यासाठी महाराष्ट्रात शासनाच्या मालकीच्या असलेल्या स्टेडियम्सकरिता भरमसाट शुल्क आकारले जात असते. सुरतमध्ये मात्र राष्ट्रकुल स्पर्धेसाठी स्थानिक शासनाने एकही पैसा न घेता दीनदयाळ उपाध्याय स्टेडियम उपलब्ध केले आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळही दिले आहे. या स्पर्धेसाठी शासनाने २० कोटी रुपये खर्च करीत उपाध्याय स्टेडियमला जागतिक दर्जेच्या क्रीडा संकुलासारखे स्वरूप दिले आहे. ४ डिसेंबर रोजी या नूतनीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी स्पर्धा संयोजकांकडे त्याचा ताबा देण्यात आला. २२ डिसेंबपर्यंत हे स्टेडियम टेबल टेनिस संयोजकांकडे राहणार आहे. हे स्टेडियम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अल्पदरात किंवा विनाशुल्क द्यावे, अशी विनंती गुजरात टेबल टेनिस असोसिएशनने सुरतच्या महानगरपालिकेला केली होती. ही विनंती मान्य करीत त्यांनी स्टेडियम व त्यामधील सुविधा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनानेही एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही स्पर्धेसाठी दिली आहे. महाराष्ट्रातील शासकीय क्रीडा सुविधांकरिता स्पर्धा संयोजकांकडून नियमित शुल्क आकारले जात असते. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत बॉक्सिंग हॉलमध्ये टेबल टेनिस सामने आयोजित करण्यासाठी साधारणपणे एका दिवसाकरिता चार हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. वातानुकूलित सेवांकरिता वेगळे शुल्क मोजावे लागते. तसेच विद्युत पुरवठय़ाकरिता आणखी खर्च करावा लागतो. महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा खेळाडूंकरिता विनाशुल्क किंवा अल्पदरात दिल्या जाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेसह विविध खेळांच्या राज्य संघटनांकडून केली जात असते. मात्र अनेक वर्षे या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा