मॉरिसच्या अष्टपैलू खेळानंतरही पराभव; गुजरातचा एका धावेने विजय
ख्रिस मॉरिसच्या अष्टपैलू खेळानंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी गुजरात लायन्स़विरुद्ध विजयाच्या उंबरठय़ावरून माघारी परतावे लागले. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना दिल्लीला केवळ १२ धावाच करता आल्या आणि अवघ्या एका धावेने त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन बळी टिपणाऱ्या मॉरिसने ३२ चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी करून नाबाद ८२ धावा चोपल्या. विजयासाठी १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ५ बाद १७१ धावा केल्या.
ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ यांच्या धमाकेदार सुरुवातीनंतरही दिल्लीने गुजरातला निर्धारित २० षटकांत ६ बाद १७२ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. मॅक्क्युलम आणि स्मिथ या जोडीने पहिल्या दहा षटकांत ११२ धावा केल्या. इम्रान ताहिर व ख्रिस मॉरिसने गुजरातच्या धावगतीवर चाप बसवला. ५३ धावा कुटणाऱ्या स्मिथला त्याने पायचीत केले. त्यापाठोपाठ मॅक्क्युलमही माघारी परतला. मॅक्क्युलमने ३६ चेंडूंत ६० धावा चोपल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. जे. पी. डय़ुमिनी आणि रिषभ पंत यांनी संघाची गाडी रुळावर आणली. अखेरच्या काही षटकांत डय़ुमिनी आणि ख्रिस मॉरिस यांनी गुजरातच्या गोलंदाजांवर प्रहार केला. मॉरिसने अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक झळकावून यंदाच्या हंगामातील जलद अर्धशतकाची नोंद केली. ४३ चेंडूंत ४८ धावांची उपयुक्त खेळी करणाऱ्या डय़ुमिनीला ड्वेन ब्राव्होने बाद करून सामन्यातील चुरस वाढवली. मात्र मॉरिसच्या आतषबाजीमुळे दिल्लीला विजयाच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा