सिंगापूर : एकीकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपल्या खेळाचा स्तर उंचावणारा भारताचा दोम्माराजू गुकेश, तर दुसरीकडे गतवर्षी जगज्जेतेपद मिळवल्यानंतर लय गमावून बसलेला चीनचा डिंग लिरेन. या दोन गुणवान बुद्धिबळपटूंमधील जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीला आज, सोमवारपासून सिंगापूर येथे सुरुवात होणार आहे. १८ वर्षीय गुकेशला सर्वांत युवा जगज्जेता म्हणून इतिहास घडविण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला सर्वोत्तम खेळच करावा लागणार हे तो जाणतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळविश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. तसेच त्याला नैराश्यालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. गेल्या काही वर्षांपासून आनंदच्या मार्गदर्शनाखालीच गुकेश सराव करत आहे. त्यामुळे आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवण्याची संधी गुकेशकडे आहे.

हेही वाचा >>> Sherfane Rutherford : १० षटकांच्या सामन्यातही शतक! शेरफन रुदरफोर्डची कमाल

‘स्पर्धा जितकी मोठी, तितका गुकेशचा खेळ बहरतो’ असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय २०२२ आणि २०२४ च्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये, तसेच या वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत आला होता. ऑलिम्पियाडमध्ये गुकेशने दोन वेळा वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली, तर कॅनडा येथे झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत त्याने मातब्बरांना मागे टाकत जेतेपद पटकावले आणि जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी तो सर्वांत युवा आव्हानवीर ठरला. गुकेशविरुद्ध खेळणे सोपे नसणार हे डिंगला ठाऊक आहे.

‘‘गुकेश खूप युवा आहे, पण त्याचा खेळ परिपक्व आहे. त्याने विविध स्पर्धांतून आपला दर्जा सिद्ध केला आहे. आम्ही दोघेही आपापली सर्वोत्तम कामगिरी करू शकलो तर ही लढत चुरशीची होईल,’’ असे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डिंग म्हणाला.

त्याच वेळी गुकेशनेही विद्यामान जगज्जेत्याला आदर दिला. ‘‘डिंगची गुणवत्ता मला ठाऊक आहे. त्याला कमी लेखण्याची चूक मी निश्चितपणे करणार नाही,’’ असे गुकेशने नमूद केले होते.

पाच वेळच्या विश्वविजेत्या आनंदला २०१३ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनकडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे आता दशकभराहूनही अधिक कालावधीपासून भारताचा जागतिक अजिंक्यपदाचा दुष्काळ संपविण्याची गुकेशकडे संधी आहे. तब्बल १३८ वर्षांनंतर दोन आशियाई बुद्धिबळपटू जगज्जेतेपदाच्या लढतीत एकमेकांसमोर येणार आहे. यात गुकेशची जगज्जेतेपदाची स्वप्नपूर्ती होणार की डिंगच सरस ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लढतीचे स्वरूप…

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि जगज्जेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. सोमवारी होणाऱ्या पहिल्या डावात गुकेशला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. तीन डावांनंतर राखीव दिवस असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gukesh and ding battle for world chess championship 2024 title zws