गल्फ जायंट्स यूएईच्या टी-२० फ्रेंचाइज लीग (ILT20) चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात त्याने डेझर्ट वायपर्सचा पराभव करून आयएल टी-२० ची पहिली ट्रॉफी जिंकली. डेझर्ट वायपर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत १४६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात गल्फ जायंट्स संघाने १९ व्या षटकातच लक्ष्य गाठले.
रविवारी (१२ फेब्रुवारी) रात्री दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात गल्फ जायंट्सचा कर्णधार जेम्स विन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्सचा हा निर्णय योग्य ठरला आणि गल्फ जायंट्सच्या गोलंदाजांनी ४४ धावांपर्यंत मजल मारताना डेझर्ट वायपर्सला ४ मोठे धक्के दिले.
येथून सॅम बिलिंग्ज (३१) आणि वानिंदू हसरंगा (५५) यांच्या खेळीमुळे डेझर्ट वायपर्सला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. गल्फ जायंट्सचा गोलंदाज कार्लोस ब्रॅथवेटने ३ आणि कैस अहमदने २ विकेट घेतल्या. डी ग्रँडहोम आणि ख्रिस जॉर्डन यांनाही प्रत्येकी एक विकेट घेतली.
ख्रिस लिनने दमदार खेळी केली.
१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गल्फ जायंट्सला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. कर्णधार जेम्स विन्स (१४) आणि अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (१) एकूण २६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. येथून ख्रिस लिनने ५० चेंडूत नाबाद ७२ धावा करत आपल्या संघाचा मोर्चा सांभाळला.
त्याला गेरहार्ड इरास्मस (३०) आणि शिमरॉन हेटमायर (नाबाद २५) यांनी चांगली साथ दिली. अशाप्रकारे गल्फ जायंट्सने १८.४ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावून सामना जिंकला. कार्लोस ब्रॅथवेटला त्याच्या दमदार गोलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले.
हेही वाचा – INDW vs PAKW: सिद्रा आमीनने सीमारेषेवर हवेत झेपावत पकडला अप्रतिम झेल, पाहा VIDEO
खेळाडूंनी केला जल्लोष –
आयएल टी-२०ची पहिली ट्रॉफी जिंकल्यानंतर गल्फ जायंट्सचे खेळाडू आनंद साजरा केला. संघातील सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो क्लिक केले. यादरम्यान स्टेडियममध्येही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.