ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या मालिकेची सुरुवात शानदार करताना ५५ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे ख्राइस्टचर्च येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय मिळवला.
मॅक्क्युलम फक्त २५ चेंडू क्रिझवर होता. परंतु ११ चौकार आणि एका षटकारासह झंझावाती खेळी साकारून तो माघारी परतला. त्यावेळी न्यूझीलंडला उर्वरित ४० षटकांत फक्त ८१ धावांची आवश्यकता होतील. मार्टिन गप्तिलने कारकीर्दीतील २६वे अर्धशतक नोंदवताना ५६ चेंडूंत ७९ धावा केल्या. तर पदार्पणवीर हेन्री निकोलस २३ धावांवर नाबाद राहिला.
त्याआधी, मॅट हेन्रीच्या भेदक माऱ्याच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेचा डाव १८८ धावांत गुंडळाला. हेन्रीने ४९ धावांत ४ बळी घेतले. त्यांच्या मिलिंदा श्रीवर्धनाने सर्वाधिक ६६ धावा केल्या.