आरएमव्ही गुरुसाईदत्तने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. मात्र अव्वल मानांकित अजय जयराम आणि सारदा जस्ती यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
अकराव्या मानांकित गुरुसाईदत्तने अटीतटीच्या लढतीत थायलंडच्या सुपन्यू अव्हिनगसेनॉनवर २१-१४, १८-२१, २१-१९ अशी मात केली. पहिला गेम सहजतेने जिंकल्यानंतर गुरुसाईदत्तला दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागला. सुपन्यूने दुसरा गेम जिंकत सामन्यातले आव्हान कायम राखले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ४-११ असे पिछाडीवर असलेल्या गुरुसाईदत्तने जोरदार मुसंडी मारत तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. पुढच्या फेरीत त्याची लढत मलेशियाच्या ली चोंग वेई आणि इंडोनेशियाच्या प्रासोजो अडी अड्रिएन्युस यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.  दक्षिण कोरियाच्या बिगरमानांकित डाँग कुअन लीने नवव्या मानांकित अजय जयरामचा २६-२४, २१-१९ असा पराभव केला. ४७ मिनिटे चाललेल्या या लढतीत अजयने प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.  महिला गटात उदयोन्मुख सारदा जस्तीही पराभूत झाली. जपानच्या युई हाशिमोटोने तिचा २१-५, २१-१३ असा धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा