प्रो कबड्डी लीग

सेनादलाच्या संघात अनेक निष्णात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळेच कामगिरीत सुधारणा झाली आहे. आता भारताकडून खेळायचे माझे स्वप्न आहे, असे गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा अष्टपैलू कबड्डीपटू जी. बी. मोरेने सांगितले.

गुरुनाथ बाबूराव मोरे हा कोल्हापूरच्या लाकूडवाडी गावचा. बालपणीपासून जोपासलेले सैन्यदलात सामील होण्याचे त्याचे स्वप्न २०१२मध्ये १९व्या वर्षी साकारले. इथेच त्याच्या नावाने ‘जी. बी. मोरे’ असे लघुरूप धारण केले. शेतकरी कुटुंबातल्या गुरुनाथची २०१६ मध्ये प्रो कबड्डी लीगकरिता पुणेरी पलटण संघाकडून निवड झाली. पुण्याकडून दोन हंगामांमध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदाच्या हंगामापासून तो गुजरात फॉच्र्युनजायंट्सचे प्रतिनिधित्व करीत आहे.

प्रो कबड्डीतील कारकीर्द सुरू झाल्यापासून गुरुनाथचे आयुष्यच पालटले. याबाबत तो म्हणाला, ‘‘पहिल्यांदा प्रो कबड्डी खेळून माझ्या गावी परतलो, तेव्हा सर्वत्र माझे फलक पाहून स्वत:चा हेवा वाटला. अगदी कोल्हापूरच्या मुख्य हमरस्त्यावरही माझे फलक पाहायला मिळाले. मी कोल्हापूरमधील प्रथितयश व्यक्तिमत्त्व झाल्याची जाणीव मला झाली. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यांमधील गावांमधील अनेक शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमांना सन्मानाने निमंत्रणे येऊ लागली आहेत.’’

गुरुनाथ आठवी-नववीला असताना त्याला कबड्डीची आवड निर्माण झाली. मग महाविद्यालयात असतानाही त्याने हा खेळ जपला. परिणामी सैन्यात कबड्डीपटू म्हणूनच त्याची नियुक्ती झाली. राष्ट्रीय स्तरावर सेनादलाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे महाराष्ट्राकडून कधीच खेळता आलेले नाही.

गुरुनाथ स्थानिक स्तरावर पुण्याच्या बाणेर येथील सतेज संघाचे प्रतिनिधित्व करतो. या ठिकाणी अप्पासाहेब दळवी यांचे मार्गदर्शन त्याला मिळते.

‘‘प्रो कबड्डी लीग खेळायला लागल्यापासून विवाहासाठी अनेक स्थळे चालून येत आहेत. माझे लग्न झाले आहे, असे सांगितल्यास लोकांचा विश्वासच बसत नाही. तू खोटे बोलतोस, असे मला सुनावले जाते. अखेरीस मला माझ्या पत्नीसोबतचे छायाचित्र त्यांना पाठवावे लागते,’’ असे गुरुनाथने सांगितले.

आजचे सामने

यूपी योद्धा वि. तमिळ थलायव्हाज

पाटणा पायरेट्स वि. हरयाणा स्टीलर्स

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

Story img Loader