आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आता मोठे मासेही अडकण्याची चिन्हे असून यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षांचा जावई गुरुनाथ मय्यपन सापडला आहे. एन. श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विनी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुरुनाथबरोबरच एन. श्रीनिवासन यांच्यावरही तोफ डागली आहे. गुरुनाथ हा नेहमीच सट्टेबाजांच्या संपर्कात होता, असा गौप्यस्फोट करत असताना दुसरीकडे एन. श्रीनिवासन यांचे विमान दुबईलाच इंधन भरण्यासाठी का थांबायचे, असा सवालही उपस्थित केला आहे.
काही कारणास्तव एन. श्रीनिवासन आणि त्यांच्या मुलामध्ये भांडण झाले होते. तेव्हापासून अश्विनीबरोबर एन. श्रीनिवासन यांच्यासह सर्वानीच नाते तोडले होते.
या खास मुलाखतीमध्ये अश्विनी म्हणाले की, दुबई आणि चेन्नईमधील सट्टेबाजांच्या संपर्कात गुरुनाथ सातत्याने पाहायला मिळायचा, त्याचे त्यांच्याबरोबर संबंध होते. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गुरुनाथ आणि सट्टेबाजांमध्ये बोलणे चालू झाले होते.
गुरुनाथवर तोफ डागताना त्याने आपले वडील एन. श्रीनिवासन यांनाही सोडलेले नाही. एन. श्रीनिवासन जेव्हा कोणत्याही परदेशवारीला जायचे तेव्हा खासगी विमानात इंधन भरण्यासाठी ते फक्त दुबईलाच थांबायचे आणि यामध्ये चार तासांचा वेळ ते काढायचे. त्यांचे विमान इंधन भरण्यासाठी कधीही शारजाह किंवा कुवैतमध्ये थांबले नाही. त्यांच्याकडे मोठे विमान घेण्याइतपत पैसे आहेत, जेणेकरून इंधनाचा प्रश्न उद्भवणार नाही. पण असे असतानाही ते दुबईलाच थांबायला पसंती द्यायचे, असे म्हणत अश्विनी यांनी एक गर्भित इशाराही दिला आहे.