इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघासमोर भारताचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेनंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला भारतीय संघात यष्टीरक्षणाची संधी दिली. यानंतर आतापर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात ऋषभ पंत खराब कामगिरी करत असताना चाहत्यांकडून धोनीला पुन्हा एकदा संघात स्थान देण्याची मागणी होत होती. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतलाच संधी देण्याचं ठरवलं. मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनीला संघात जागा हवी असल्यास त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल असं वक्तव्य केलं होतं. मात्र सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धेचं भवितव्य अधांतरी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समालोचक हर्षा भोगले यांच्या मते धोनी आता भारताकडून खेळेल याची शक्यता कमी आहे. Cricbuzz संकेतस्थळच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना भोगले यांनी आपलं मत मांडलं. “माझं मन मला सांगतंय की धोनी आता भारताकडून खेळणार नाही. आगामी टी-२० विश्वचषकासाठी तो तयारी करत असेल असं मला खरंच वाटत नाही. केवळ आयपीएलचा हंगाम चांगला जावा ही त्याची इच्छा असू शकते. मात्र असं असलं तरीही त्याने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत रहावं. आयपीएलमध्ये धोनी खेळत असताना त्याला पाठींबा देण्यासाठी हजारो चाहते मैदानावर, टिव्ही समोर असतात. त्यांच्याशी त्याचं भावनिक नातं निर्माण झालेलं आहे.”

मात्र धोनीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांच्या मते धोनी आगामी टी-२० विश्वचषकात खेळेल. “सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्पर्धा होईल याची शक्यता कमीच आहे, आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पहावी लागेल. सध्याच्या परिस्थितीमुळे धोनीसमोर मोठं आव्हान असणार आहे. पण माझं अंतर्मन मला सांगतंय की धोनीला टी-२० विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळेल, ही त्याची शेवटची स्पर्धा असेल”, धोनीचे प्रशिक्षक बॅनर्जी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. चेन्नईवरुन परतल्यानंतर मी त्याच्याशी संपर्कात आहे. तो सध्या आपल्या फिटनेसवर लक्ष देतोय, त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होतंय हे पहावं लागणार आहे, बॅनर्जींनी धोनीबद्दल माहिती दिली.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरासह भारतातल्या क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक भारतीय खेळाडू करोनाविरोधातील लढ्यात आपली भूमिका बजावत आहेत. आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, हिमा दास या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपलं सामाजिक भान राखत मदत केली आहे. याव्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gut feel is ms dhonis india ambitions are over says harsha bhogle psd