गुवाहाटी : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता आणखी ताणली जाणार आहे. आसाम कुस्ती संघटनेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुवाहटी उच्च न्यायालयाने रविवारी भारतीय कुस्ती महासंघाच्या ११ जुलैला होणाऱ्या निवडणुकीस स्थगिती देण्याचा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कुस्ती महासंघाच्या १५ नोव्हेंबर २०१४ मध्ये गोंडा येथे झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आसामच्या संलग्नत्वाला मान्यता दिली होती. मात्र, हे संलग्नत्व अजूनही मान्य करण्यात आले नसल्यामुळे आसाम कुस्ती संघटनेने कुस्ती महासंघ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची हंगामी समिती आणि क्रीडा मंत्रालयाविरुद्ध या संदर्भात एक याचिका दाखल केली होती.

अन्य काही संघटनांच्याही सदस्यत्वाचा प्रश्न असल्यामुळे हंगामी समितीने मतदारांची यादी निश्चित करण्यासाठी २५ जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती आणि निवडणूक ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान जोपर्यंत संस्था महासंघाशी संलग्न होत नाही, तोवर आम्ही मतदार निश्चित करू शकत नाही. त्यामुळे तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया रोखली गेली पाहिजे, असा युक्तिवाद आसाम संघटनेच्या वतीने करण्यात आला. यानंतर न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत महासंघाची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश महासंघाच्या हंगामी समिती व क्रीडा मंत्रालयाला दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.

योगेश्वर, बजरंगमध्ये नवे शाब्दिक युद्ध

नवी दिल्ली : भारतीय मल्ल सध्या मॅटपेक्षा समाजमाध्यमांवरच एकमेकांशी लढत असल्याचे चित्र दिसत आहे. साक्षी-बबीता, योगेश्वर-विनेश यांच्यानंतर आता योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनिया शाब्दिक युद्धात दंग होते. ऑलिम्पिक पदक विजेत्या योगेश्वरने अनेकदा जाणूनबुजून लढती हरण्यास सांगितल्याचा दावा बजरंगने केल्यावर योगेश्वरने त्याला तो साफ खोटे बोलत असून, मी कधीच त्याला असे करण्यास सांगितले नाही असे उत्तर दिले. ‘‘ऑलिम्पिकसाठी ६५ किलो वजनी गटाच्या पात्रता फेरीत अमित धनकरने बजरंगला पराभूत केले. अंतिम फेरीत अमित माझा प्रतिस्पर्धी होता. कारकीर्द सुरू असताना परदेशातील सरावासाठी मी नेहमीच बजरंगला साथीदार म्हणून घेऊन गेलो. हे माहीत असूनही बजरंगने केलेल्या वक्तव्याने मला दु:ख झाले. त्याने माझा विश्वासघात केला,’’असे योगेश्वर म्हणाला. ‘‘बजरंगने २०१८ मध्ये मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला जाऊ द्या व आशियाई स्पर्धेसाठी तुम्ही जा असे सांगितले. पण, मी त्याला निवड चाचणीत निर्णय घेईन असे सांगितले. तेव्हापासून बजरंग माझ्यापासून दूर गेला.’’असेही योगेश्वरने सांगितले. यानंतरही बजरंगने इटली येथील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात योगेश्वरने आपणास हरण्यास सांगितल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, योगेश्वरने हा मुद्दाही खोडून काढला. ‘‘रियो ऑलिम्पिकनंतर मी कुठल्याच स्पर्धेत खेळलो नाही. २०१८ पासून मी स्पर्धात्मक लढतीपासूनही दूर राहिलो. कुस्तीच सोडली होती. आता मी माजी कुस्तीगीर आहे. मी असे सल्ले का देईन?’’असा सवाल योगेश्वरने उपस्थित केला.

सूट नव्हे, तयारीसाठी वेळ मागितला -विनेश

आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी होणाऱ्या कुस्ती निवड चाचणीतून आम्ही सूट मागितलेली नाही, तर तयारीसाठी वेळ मागितला यावर भारतीय कुस्तीगीर विनेश फोगट रविवारीही ठाम होती. आंदोलनात सहभागी झालेल्या सहा कुस्तीगिरांना निवड चाचणीतून सूट देऊन केवळ विजेत्यांविरुद्ध लढण्याची परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयावरून अजून चर्चा सुरू आहे. या संदर्भात उत्तर देताना विनेशने रविवारी क्रीडा मंत्रालय आणि हंगामी समितीला लिहिलेले पत्रच सादर केले. यामध्ये आम्ही दोघांनाही अंतिम संघ पाठविण्याची मुदत वाढवून घेण्याची विनंती केली होती. निवड चाचणीतून सूट मागितलेली नाही. आम्हाला तयारीसाठी थोडा वेळ हवा, असे या पत्रात म्हणण्यात आल्याचे विनेशने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guwahati high court postpond wrestling federation elections zws
Show comments