शैलेश परुळेकर

कुस्तीपटू विनेश फोगटची ऑलिम्पिकमध्ये हुकलेली ‘सुवर्ण’संधी सर्व भारतीयांच्या काळजाला चटका लावून गेली. त्याविषयी समाजमाध्यमांवर बराच उलट-सुलट खल झाला. मात्र, याकडे खेळाच्या आणि त्यासाठी खेळाडूने करायच्या विशेष प्रयत्नांच्या दृष्टिकोनातून नेमके कसे पाहायला हवे, हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. त्या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तंदुरुस्ती प्रशिक्षण करणारे व्यायाम प्रशिक्षक शैलेश परुळेकर यांनी मांडलेले हे मत.

प्रत्येक भारतीय नागरिकाप्रमाणेच मलादेखील विनेश फोगटने कुस्तीच्या आखाड्यात-रिंगणात-मैदानात आणि मैदानाबाहेर दिलेल्या लढ्याबद्दल कौतुक, आदर आहे. पण, ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून वजनात न बसल्याने ती अपात्र ठरली, याकडे भावनिकदृष्ट्या न पाहता जागरूकपणे, डोळसपणे बघायला हवे, तरच भविष्यात अशा गोष्टी टाळता येऊ शकतील. सर्वांत प्रथम – विनेश असा खेळ खेळते, की जो वजनी गटात खेळला जातो. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महिला फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ५०, ५३, ५७, ६२, ६८ आणि ७६ किलो असे वजनी गट आहेत. कुस्तीव्यतिरिक्त मुष्टियुद्ध, किक बॉक्सिंग, मिश्र मार्शल आर्ट, भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग), रोइंग या खेळांमध्ये वजनी गट असतात. शारीरिक संपर्क होणाऱ्या क्रीडा प्रकारात तुल्यबळ प्रतिस्पर्धी असावा, यासाठी हे नियम असतात. म्हणजे आपले वजन आपल्या आवाक्यात असणे ही सर्वांत प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण गरज आहे.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
Marathi actress Aishwarya Narkar fan asks her weight
“तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

हेही वाचा >>> Vinesh Phogat Case : विनेश फोगटच्या पदकासंदर्भात सुनावणी पूर्ण, पदक मिळणार की नाही याचा फैसला ‘या’ दिवशी होणार

आता ही प्राथमिक गरजच तुम्हाला पाळता येत नसेल, तर तुम्ही पूर्वतयारीत कमी पडला आहात, हे मान्य करावे लागेल. आज ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन, जलतरण, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, अॅथलेटिक्स, भालाफेक, बॅडमिंटन आणि टेनिस अशा वजनी गट नसलेल्या खेळांतदेखील सर्व खेळाडू, आपले वजन प्रमाणित ठेवण्यासाठी शर्थ करतात, अगदी ग्रॅम्समध्येही. वजन हा साधा शब्द झाला. खेळाडू बॉडी कम्पोझिशनही निगुतीने सांभाळतात. म्हणजे शरीरातील स्नायू, हाडे, चरबी, पाणी, रक्त यांचे योग्य प्रमाण राखतात. बहुतेक खेळांमध्ये चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. तसेच, त्या-त्या खेळासाठी उपयुक्त एवढे स्नायूंचे वजन राखले जाते. टूर डी फ्रान्स या अतिशय खडतर सायकल स्पर्धेत, जी सलग तीन आठवडे चालते, त्यात खेळाडू त्यांचा पोषण आहार आणि वजन यांवर देखभाल ठेवून, तो योग्य प्रमाणात राखून सर्वोच्च पातळीवर कामगिरी करत असतात. हे सगळे सविस्तर सांगण्याचे कारण असे, की प्रत्येक खेळात वजन, बॉडी कम्पोझिशनचा मोठा आणि मोलाचा वाटा असतो, ज्याकडे खेळाडू नीट लक्ष देतात.

याकडे नीट लक्ष द्यायलाच हवे होते…

आज खेळाचे, आहाराचे विज्ञान इतके प्रगत झाले असताना स्पर्धेच्या अंतिम फेरीआधी रात्रभर जागून सायकलिंग करून, दोरीच्या उड्या मारून, जॉगिंग करून, केस कापून, शरीरातील पाणी धोकादायक पातळीपर्यंत कमी करून, रक्त काढून वजन कमी करण्याचे जे अघोरी प्रकार झाले, ते पटण्यासारखे नाहीत. सामन्याच्या आदल्या रात्री प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अभ्यास करून डावपेच आखणे आणि शांत झोपणे – जे कठीण आहे, पण किमान गादीवर पडून राहणे आणि सर्व ऊर्जा स्पर्धेसाठी राखून ठेवणे हे अपेक्षित आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खेळाडू उत्तम स्थितीत असला पाहिजे.

१०० ग्रॅम हा फसवा आकडा आता १०० ग्रॅम हा फसवा आकडा आहे. विनेशचे वजन स्पर्धेच्या एका दिवसात दोन किलोने वाढले आणि रात्रभर प्रयत्न करूनही ती शेवटचे १०० ग्रॅम कमी करू शकली नाही. यामुळे अनेकांना इतकेच तर कमी पडले, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, असे आहे, की आपण कुठलीही गोष्ट सांगताना त्याला १०० टक्के हे परिमाण जोडतो. जगातील सर्वांत वेगवान धावपटू हा १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचा विजेता असतो. क्रिकेटमध्येही १०० धावांचे महत्त्व सर्व भारतीयांना माहीत आहे. तसाच ग्रॅम हाही छोटा अंक नसून खूप मोठा आकडा आहे. ऑलिम्पिक किंवा जागतिक स्तरावरील इतर स्पर्धांत धावणे, जलतरण आदी स्पर्धांतील जय-पराजय वा विक्रम सेकंदाच्या काही हजाराव्या भागाने ठरविण्याची वेळ येते. उंच उडी, लांब उडीचे विक्रम फुटांत नाही, तर अगदी सेंटीमीटरने मोडले वा रचले जातात. म्हणजेच इथे फार वरवरचा किंवा ढोबळ विचार करून चालत नाही. त्यात अगदी नेमकेपणा लागतो.

विनेशचे वजन आणि गट विनेशचे सर्वसाधारण वजन ५५ ते ५६ किलो आहे. ती या आधीच्या स्पर्धांत ५३ किलो गटात खेळली आहे. आता हीसुद्धा सर्वसामान्य गोष्ट आहे. स्पर्धक आहार कमी करून, शरीरातील पाणी कमी करून, स्टीम सौना घेऊन वजन तात्पुरते कमी करतात आणि आपल्या सर्वसाधारण वजनापेक्षा कमी वजनी गटात खेळण्यास प्राधान्य देतात. यामध्ये ताकद कमी होत नसल्याने समोरच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जिंकण्याची संधी अधिक राहते. विनेशला गेली काही वर्षे (ही विनेशची तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती) वजन २ ते ३ किलो कमी करून खेळण्याची सवय आहे. मात्र, या वेळी एकदम दुप्पट, म्हणजे ५ ते ६ किलो वजन कमी करून, ते राखून खेळणे हा पहिला अडथळा, पहिले आव्हान होते. देशांतर्गत ऑलिम्पिक निवड चाचणीनंतर शरीराला या नवीन वजनी गटात स्थिरावण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळही होता. विनेशसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि कंडिशनिंग प्रशिक्षक, मसाजतज्ज्ञ, फिजिओ असा सर्व चमू असतो. आणि, स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याची या सर्वांची वैयक्तिक आणि संघ म्हणून जबाबदारी असते. विनेशच्या प्रकरणात वजन राखणे ही खेळाडू, म्हणजे ती स्वत:, प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ आणि इतर चमूची जबाबदारी होती. कुस्तीची जी तयारी करतात, त्याला तालीम म्हटले जाते. नाटकाचीदेखील तालीम होते. साध्या सोप्या भाषेत सराव. आता ऑलिम्पिक हे खेळाडूसाठी त्याचे कौशल्य दाखविण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असेल, तर वजन वाढवून कमी करण्याची तालीम किती वेळा केली गेली होती, हा प्रश्न निर्माण होतो. याशिवायही काही प्रश्न निर्माण होतात, ते असे…

– सर्व खेळाडू त्यांच्या व्यायामाची, खाण्याची, झोपण्याची, रेस्टिंग हार्ट रेटची नोंद वर्षानुवर्षे ठेवतात. ती विनेशच्या बाबतीत केली जात होती का? – विनेशचे बॉडी कम्पोझिशन काय होते? लीन मसल-चरबीची टक्केवारी, शरीरातील पाण्याचे प्रमाण आदी मोजण्याची साधने आता सहज उपलब्ध आहेत. हे दररोज तपासले जात होते का? – तिच्या मते काही चुकीच्या गोष्टींविरोधात ती नुकतीच संपूर्ण व्यवस्थेविरोधात उभी राहिली होती. त्यामुळे तिच्या मानसिक तणावाची पातळी उच्च असणार. मानसिक तणावामुळे वजन वाढते. त्याकडे लक्ष दिले गेले होते का? तणाव पातळी कमी ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग, मसाज थेरपी आदी उपाय केले गेले होते का? झोप व्यवस्थित होत होती का? आणि या सगळ्याच्या नोंदी आहेत का?

प्रशिक्षक-खेळाडू जबाबदारी

सर्व खेळांतील प्रशिक्षकांचे काही स्तर असतात. पहिला, नुकताच सुरुवात केलेला, दुसरा, काही वर्षे अनुभव असलेला आणि तिसरा प्रचंड अनुभवी. प्रशिक्षकांप्रमाणेच त्यांच्या शिष्यांचेही असेच तीन स्तर असतात. जेव्हा प्रशिक्षक प्रचंड अनुभवी आणि खेळाडूही पूर्ण अनुभवी आणि व्यावसायिक असतो, तेव्हा सगळा खेळ हा आकड्यांचा आणि नेमकेपणाचा असतो. अतिशय संतुलित आहार, तो घेण्याच्या, झोपण्याच्या, व्यायामाच्या वेळा, व्यायामाचे प्रकार, पाणी पिण्याचे प्रमाण आदी गोष्टींचे नियोजन करावे लागते आणि ते १०० टक्के अनुसरावे लागते. शिवाय, या सगळ्या पद्धती वैयक्तिक स्तरावर लागू होतात. एकच पद्धत प्रत्येकाला लागू होईल, असे नाही किंबहुना होतच नाही. त्यामागे स्वास्थ्यापेक्षाही त्या खेळाच्या, खेळाडूच्या गरजांचा विचार अधिक करावा लागतो. साहजिकच या स्थितीत फार कमी वेळ, म्हणजे केवळ स्पर्धेपुरते राहायचे असते. सगळा खटाटोप फक्त स्पर्धेच्या कालावधीसाठी असतो. अशा वेळीच तुम्ही ही कामगिरी पार पाडू शकला नाहीत, तर तुमच्याकडे नियोजनाची कमतरता होती, हे मान्य करावे लागते. प्रत्यक्ष खेळताना चुका होणे, जिंकणे, हरणे हे समजून घेता येऊ शकते, पण अंतिम स्पर्धेला उतरताच आले नाही, तर विषय गंभीर बनतो. या स्तरावरील प्रशिक्षक आणि खेळाडूकडून जगातील सर्वोत्तम शरीर काळजीपूर्वक हाताळण्याचे कौशल्य अपेक्षित असते. या प्रकरणात तर विनेशला तिच्या अंतिम सामन्याच्या दिवशी रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी स्थिती उद्भवली. आता खरेतर या पातळीवरील प्रशिक्षण हे शुद्ध विज्ञान आहे, आणि कलाही. सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशांची स्पर्धा असताना चुकीला फार कमी जागा असते. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्याएवढेच गुणवत्तावान, स्वयंप्रेरित आणि प्रचंड मेहनती असतात. त्यामुळे चालून जाईल, वेळ आल्यावर बघू, वेळ मारून नेऊ या गोष्टींना थारा नसतो. मुळात अशा विशिष्ट कामगिरीसाठी तयारी करण्याच्या प्रयत्नांना प्रकल्प म्हणतात, जेथे प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म देखभाल आणि त्याची नोंद अपेक्षित असते. याचा तुमच्या पुढील वाटचालीसाठीही फायदा होऊ शकतो. खेळाडूची जितक्या वेळा शक्य तितक्या वेळा अधिकाधिक माहिती संकलित करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक असते. बॉडी कम्पोझिशन, रिकव्हरी आणि मानसिक स्वस्थतेचे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. वजन कमी करण्याचा खेळही स्पर्धेच्या आठ दिवस आधी सुरू होतो. त्या प्रत्येक दिवसानुसार व्यूहरचना आखावी लागते. स्पर्धेच्या दिवसाचे वजन करण्याची वेळ आणि वजन झाल्यावर प्रत्यक्ष खेळाची सुरुवात इथपर्यंत मिनिटा मिनिटाचे सखोल नियोजन असावे लागते. स्पर्धेनंतर खेळाडू त्याच्या सर्वसाधारण वजनावर येईपर्यंत हा सगळा ‘प्रकल्प’ असतो. खेळाडूचे प्रशिक्षक आणि आहारतज्ज्ञ यांची जबाबदारी तिथवर असते. विनेशच्या बाबतीत बोलायचे, तर तिने एवढ्या मोठ्या कारकिर्दीत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना कमीत कमी १०० वेळा वजनात चढ-उतार केले असणार. म्हणजे प्रचंड अनुभव गाठीशी असणार. शिवाय, ऑलिम्पिक समितीचे नियम काटेकोर असतात आणि खेळाडूवर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेची (वाडा) बारकाईने नजर असते. आता जे घडले, ते घडले. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, की क्युबाचा महान कुस्तीपटू मिलेन लोपेझ २००८ पासून २०२४ पर्यंतच्या ऑलिम्प्कि स्पर्धांत खेळून सुवर्णपदकविजेता ठरला. ३७ वर्षीय टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने २१ वर्षीय कार्लोस अल्कराझला हरवून सुवर्णपदक जिंकले. कीपचोगे त्याच्या तिसऱ्या ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी मॅरेथॉन धावत आहे. या सगळ्यांकडून प्रेरणा घेऊन विनेशने तिच्या निवृत्तीचा विचार बदलावा आणि परत आखाड्यात उतरावे.