पीटीआय, नवी दिल्ली
भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चाचणी संघटनेने (आयटीए) घेतलेल्या उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दीपा दोषी आढळल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाच्या संकेतस्थळावर दीपाची ‘निलंबित’ अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र, दीपाचे निलंबन हे उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाशी संबंधित नसल्याचे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून सांगण्यात आले होते. परंतु आता दीपाच्या निलंबनाचे खरे कारण समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघासाठी काम करणाऱ्या ‘आयटीए’ या स्वतंत्र उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने दीपाची स्पर्धाविरहित कालावधीत चाचणी घेतली होती. यात दीपाच्या शरीरात ‘हिजेनामाइन’ हे उत्तेजक सापडले आहे. या द्रव्यावर जागतिक प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे.दीपावर २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली असली, तरी या बंदीचा कालावधी या वर्षी १० जुलैपर्यंतच असेल. तिची ११ ऑक्टोबर २०२१मध्ये चाचणी झाली होती. तेव्हापासून बंदीचा कालावधी ग्राह्य धरला गेला आहे.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट क्रीडा प्रकारात चौथे स्थान मिळवल्यानंतर प्रकाशझोतात येणाऱ्या दीपाला गेल्या काही वर्षांपासून दुखापतींनी सतावले आहे. २०१७मध्ये तिच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तिला फारशा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवता आलेला नाही.अनवधानाने माझ्याकडून उत्तेजक द्रव्याचे सेवन झाले असावे. हे द्रव्य माझ्या शरीरात कशामुळे गेले हे कळलेले नाही. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघासोबत मिळून या प्रकरणावर तोडगा काढता यावा याकरिता माझ्यावर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला आहे. – दीपा कर्माकर