जसप्रीत बुमराह सध्या आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. मात्र असं असलं तरीही गेल्या काही वर्षांत जसप्रीतने भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून संघात आपली जागा पक्की केली आहे. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआय जसप्रीतच्या पाठीच्या दुखण्यावर लंडनमध्ये उपचार करणार आहे. यावेळी भारतीय संघापासून दुरावलेल्या जसप्रीतने एका कार्यक्रमात व्हिडीओमार्फत आपल्या लहानपणातील खडतर आठवणींना उजाळा दिला.

मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जसप्रीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

जसप्रीतची आई दलजितने यावेळी लहानपाणापासून जसप्रीतच्या क्रिकेटप्रेमाविषयी भाष्य केलं. “जसप्रीत पाच वर्षांचा असताना माझ्या पतीचं निधन झालं.” आपल्या आईने सांगितलेल्या आठवणीनंतर बोलताना जसप्रीत म्हणाला, “बाबा गेल्यानंतर आम्हाला फारशा गोष्टी नवीन घेणं परवडत नव्हतं. माझ्याकडे बुटांची एक जोडी होती आणि एक टी-शर्ट होता. मी तोच टी-शर्ट धुवून रोज वापरायचो.”

जसप्रीतला पहिल्यांदा टीव्हीवर सामना खेळताना पाहिलं त्यावेळी मी रडायला लागले. त्याने मला मानसिक आणि शाररिकदृष्ट्या झगडताना पाहिलं आहे, जसप्रीतची आई बोलत होती.