जर्मनीची आंद्रेया पेटकोव्हिक व रुमानियाची सिमोनी हॅलेप यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. २८व्या मानांकित आंद्रेयाने इटालीच्या दहाव्या मानांकित सारा इराणीचे आव्हान ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. तसेच चौथ्या मानांकित हॅलेपने २७व्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोवाची घोडदौड ६-२, ६-२ याच फरकाने रोखली. बुधवारी पावसामुळे अनेक सामने दिरंगाईने सुरू झाले.
आंद्रेयाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सारा हिने पहिल्या सेटमधील पहिल्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत झकास सुरुवात केली, मात्र तिचा हा आनंद अल्पकाळ ठरला. कारण तिची सव्‍‌र्हिस तोडण्यात आंद्रेयाला यश मिळाले. आंद्रेयाने सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवीत ३-२ अशी आघाडी घेतली. पाठोपाठ तिने स्वत:ची सव्‍‌र्हिसही राखण्यात यश मिळविले. सारा हिने दडपणाखाली केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत आंद्रेयाने पुन्हा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तिने ५-२ अशी आघाडी घेतली व पुढच्या गेममध्ये स्वत:ची सव्‍‌र्हिस राखून तिने हा सेट २७ मिनिटांमध्ये घेतला. तिने या सेटमध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या सव्‍‌र्हिस तोडल्या. सहाव्या गेममध्ये आंद्रेया हिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. पुन्हा आठव्या गेममध्येही तिने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत हा सेट घेतला व विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यात कुझ्नेत्सोवापेक्षा तरुण असलेल्या हॅलेप हिने सामन्याच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळविले. तिने पहिल्या सेटमध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांबरोबरच बॅकहँडच्या फटक्यांचाही सुरेख खेळ केला. तिने या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तिने हा सेट ६-२ असा ३३ मिनिटांमध्ये घेतला. दुसऱ्या सेटमध्ये कुझ्नेत्सोवा हिने आव्हान टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. हॅलेपने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवीत ४-१ अशी आघाडी घेतली. तथापि, कुझ्नेत्सोवा हिने पुढच्याच गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला व ही गेम घेत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. मात्र तिने सातव्या गेममध्ये सव्‍‌र्हिस गमावली. तिने केलेल्या चुकांचा फायदा घेत हॅलेप हिने ही गेम घेतली व पाठोपाठ स्वत:ची सव्‍‌र्हिस राखून दुसरा सेट जिंकला. हा सेट ५० मिनिटांत घेत तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Story img Loader