फॉम्र्युला- वन शर्यतीवर मर्सिडीज संघाच्या लुईस हॅमिल्टनची मक्तेदारी रविवारी स्पॅनिश ग्रां. प्रि. शर्यतीत त्याचाच संघ सहकारी निको रोसबर्गने मोडली. हॅमिल्टनला पराभूत करून रोसबर्गच्या चेहऱ्यावर सुखावणारे समाधान दिसत होते. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ब्राझिलीयन ग्रां. प्रि. शर्यतीनंतरचे रोसबर्गचे हे पहिलेच जेतेपद आहे.
 ‘‘ही शर्यत सर्वोत्तम होती. पोल पोझिशननंतर जेतेपद पटकावण्याचा समाधान सुखावह आहे. जेतेपदासाठी खूप कालावधी लागला,’’ असे मत रोसबर्ग याने व्यक्त केले.
पोल पोझिशनपासून स्पध्रेची सुरुवात करणाऱ्या रोसबर्गने १ तास ४१ मिनिट व १२.५५ सेकंदात शर्यत पूर्ण करत विजय मिळवला. त्यापाठोपाठ हॅमिल्टनने १७.५५ सेकंदांनंतर, तर फेरारीच्या सेबॅस्टीयन वेटेलने ४५.३४ सेकंदांनंतर र्शयत पूर्ण करून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.