भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारी याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत अर्धशतक झळकावले. शून्यावर असताना त्याला पंचांनी बाद ठरवले होते. पण DRS रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळाले. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकी खेळी साकारली. या कामगिरीसह असे करणारा तो २६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमा फलंदाजीसाठी मैदानावर आला. पण सातव्या चेंडूवर पंचांनी त्याला पायचीत बाद ठरवले. त्यामुळे पदापर्णाच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. मात्र, समोर फलंदाजीसाठी उभा असलेल्या विराट कोहलीने DRS चा निर्णय घेण्यास हनुमाला मदत केली. या रिव्ह्यूमध्ये हनुमाला नाबाद ठरवण्यात आले. त्यानंतर हनुमाने संधीचे सोने केले आणि अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

पहिल्या डावात हनुमाने ५६ धावा केल्या. फिरकीपटू मोईन अलीने त्याला झेलबाद केले. बचावात्मक फटका खेळताना यष्टिरक्षकाने त्याचा झेल टिपला. पंचांनी बाद दिल्यावर यावेळीही त्याने DRSचा आधार घेतला होता. मात्र यावेळी रिव्ह्यूमध्येही त्याने बाद ठरवण्यात आले.

Story img Loader