इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात भारताकडून मुंबईकर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली. तर आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी यालादेखील अनपेक्षितपणे संघात स्थान देण्यात आले. बीसीसीआयने टि्वट करून संघाबाबत माहिती दिली.

हनुमा विहारीला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसून भारत इंग्लंड कसोटी सामन्यात तो प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. हनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची खेळी केली होती. तर याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळीही केली होती.

या दोन सामन्यात हनुमाला संधी मिळेल की नाही याबाबत खात्री नसली, तरी मैदानावर उतरण्याआधीच हनुमाने एक पराक्रम केला आहे. हनुमाच्या निमित्ताने भारतीय कसोटी संघात १९ वर्षानंतर आंध्र प्रदेशच्या एखाद्या खेळाडूची निवड झाली आहे. याआधी भारतीय संघाचे सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हे भारतीय संघाकडून खेळले होते.

दरम्यान, दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते. तो उद्या सकाळी इंग्लंडला प्रयाण करणार असून २४ ऑगस्टला इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे, अशी माहितीही त्याने दिली आहे.

Story img Loader