भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या सामन्यांसाठी भारताकडून मुंबईकर पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी याला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. आपल्या संघातील निवडीबाबत हनुमा विहारी हा अत्यंत खुश झाला असून हा आपल्यासाठी सुखद धक्काच असल्याचे त्याने म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला कि मी एका वेगळ्याच स्पर्धेची तयारी करत होतो. टीम इंडियासाठी माझी निवड होईल अशी मला आता अपेक्षा नव्हती. चारंगी मालिकेसाठी मी तयारी करत होतो. पण मला अचानक सायंकाळी याबाबत समजले आणि मला प्रचंड आनंद झाला, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
मी उद्या सकाळी इंग्लंडला प्रयाण करणार असून २४ ऑगस्टला इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे, अशी माहितीही त्याने दिली.
भारतीय संघ आणि विराट कोहली सारख्या मोठ्या खेळांडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल आणि मी मला शक्य तेवढे सर्व काही शिकण्याचा प्रयत्न करेन. कारण ही संधी नेहमी येत नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी काय पद्धतीची तयारी लागते, तेदेखील मला समजू शकेल, असेही तो म्हणाला.
दरम्यान, हनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची खेळी केली होती. तर याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळीही केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे मानले जात आहे.