Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात हनुमा विहिरीने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात हनुमा विहरीला पंचांनी शून्यावर बाद दिले होते. पण DRSने त्याला या नामुष्कीपासून वाचवले आणि कोणत्याही खेळाडूला नकोशा वाटणाऱ्या विक्रमापासून तो बचावला.
हनुमा खेळण्यास आला असताना सातव्या चेंडूवर पंचांनी त्याला पायचीत बाद ठरवले होते. त्यामुळे पदापर्णाच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. मात्र, समोर फलंदाजीसाठी उभा असलेल्या विराट कोहलीने DRS चा निर्णय घेण्यास हनुमाला मदत केली. या रिव्ह्यूमध्ये हनुमाला नाबाद ठरवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हनुमा २५ धावांवर नाबाद आहे. तर जडेजा ८ धावांवर खेळत असून भारताची मदार या जोडीवर आहे.
तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय संघात हनुमा विहिरीच्या रूपाने एका आंध्र प्रदेशच्या खेळाडूला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. तर इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद ३३२ धावांवर संपला आहे.