सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. मयांक अग्रवालला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. मात्र मयांकसोबत सलामीला कोण येणार याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. काहीजणांचं मत रोहित शर्माला सलामीला पाठवण्यात यावं असं होतं. मात्र आता मधल्या फळीतला फलंदाज हनुमा विहारीला सलामीला पाठवण्यात येणार आहे. खुद्द निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.

अवश्य वाचा – IND vs AUS : तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, मयांक अग्रवालला संघात स्थान

आतापर्यंत हनुमा विहारीकडे केवळ दोन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. इतक्या कमी अनुभवाच्या जोरावर हनुमाला सलामीला पाठवण्याच्या जोखिमीबद्दल विचारलं असता प्रसाद म्हणाले, ” जर हनुमा सलामीच्या जोडीमध्ये अपयशी ठरला तर नंतरच्या काळात त्याला मधल्या फळीत योग्य संधी दिल्या जातील. हनुमा विहारी हा सलामीच्या जोडीसाठीचा योग्य पर्याय नाहीये याची कल्पना मलाही आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हनुमा ही जबाबदारी सांभाळू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. विहारीच्या फलंदाजीची शैली ही उत्तम आहे, त्यामुळे आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा आहे.”

अवश्य वाचा – BLOG : बॉक्सिंग डे कसोटीतून भारताला सापडलेले 3 बॉक्सर्स !

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मयांक अग्रवालसोबत रविंद्र जाडेजा आणि रोहित शर्मालाही जागा देण्यात आली आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्यांदाच परदेशा मालिका विजयाची चांगली संधी आलेली आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : मी कोण आहे हे लोकांना सांगत बसायची गरज वाटत नाही – विराट कोहली

Story img Loader