मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. २४ एप्रिल या दिवसाला जसं सचिनच्या आयुष्यात महत्व आहे, तसंच २४ फेब्रुवारी दिवसदेखील सचिनच्या आयुष्यातील एक खास दिवस आहे. २०१० साली याच दिवशी भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या द्विशतकाची नोंद केली होती. ग्वालियरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात सचिनने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना नाबाद २०० धावा फटकावल्या होत्या. पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक त्यादिवशी झळकावलं गेलं होतं. पण सचिनच्या आधीच एका क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं होतं.
सचिनच्या ‘स्ट्रेट ड्राईव्ह’वरून मुंबई पोलिसांचं हटके ट्विट
सचिनने केवळ १४७ चेंडूत नाबाद २०० धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीत २५ चौकार आणि ३ षटकारांसह समावेश होता. तो सामना भारताने सचिनच्या दमदार खेळीच्या जोरावर जिंकला होता. पण ते द्विशतक पुरूषांच्या क्रिकेटमधील पहिले वन-डे आंतरराष्टीय द्विशतक ठरले. सचिनच्या आधी एका महिला क्रिकेटपटूने वन-डे सामन्यात आधीच द्विशतक झळकावले होते. ती महिला क्रिकेटपटू म्हणजे ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्क…
साराने खास फोटो पोस्ट करत दिल्या सचिनला शुभेच्छा
परळच्या ‘जबरा फॅन’कडून सचिनला अनोख्या शुभेच्छा
ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क हिने पुरूष आणि महिला अशा दोनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून पहिलेवहिले द्विशतक लगावले होते. १९९७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलिया विरूद्ध डेन्मार्क असा सामना रंगला होता. या सामन्यात बेलिंडाने अभूतपूर्व कामगिरी केली होती. बेलिंडाने त्या सामन्यात १५५ चेंडूत नाबाद २२९ धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ३ बाद ४१२ धावांचा डोंगर उभा केला होता. यास प्रत्युत्तर देताना डेन्मार्कचा संघ मात्र केवळ ४९ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तो सामना ३६३ धावांनी जिंकला होता.