पुनरागमनाच्या चर्चेने आनंद झाला आहे मात्र निवृत्ती सोडून पुन्हा संघात परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइक हसीने स्पष्ट केले.
माइक हसीने निवृत्ती घेतली आहे, मात्र संघहितासाठी परतण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे स्वागत असल्याचे उद्गार ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर हसी बोलत होता.
मायकेल हसी हा ऑस्ट्रेलियन संघासाठी आधारस्तंभ होता. हसीच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाच्या संघव्यवस्थापनाला येत आहे. अननुभवी फलंदाजांना मार्गदर्शन तसेच संघाला तारण्यासाठी हसीसारख्या फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला नितांत गरज आहे. त्यामुळे हसीने निवृत्ती सोडून परतल्यास ऑर्थर यांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.
जानेवारीत निवृत्त झालेल्या हसीच्या नावावर ७९ कसोटींत ५१.५२च्या सरासरीने ६२३५ धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतरचे आयुष्य मी आनंदाने व्यतीत करत आहे. क्रिकेटविरहित जगणे कठीण आहे, पण आता हळूहळू या आयुष्याला मी सरावत आहे. मला पुन्हा त्या दडपणाच्या परिस्थितीत परतायचे नाही, अ‍ॅशेससारख्या खडतर मालिकेच्या पाश्र्वभूमीवर तर संघात पुनरागमन करण्याची इच्छा आणि तयारी नसल्याचे हसीने स्पष्ट केले.
भारताविरुद्धच्या मालिकेत ०-३ने पिछाडीवर पडलेला ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या कठीण कालखंडातून जात आहे. मात्र या संघाला मदतीचा हात देण्यासाठी परतणार नाही कारण मी सध्या माझ्या कुटुंबीयांसमवेत आनंदाने वेळ व्यतीत करत आहे. ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंसाठी पुढील काही महिने तणावपूर्ण असणार आहेत.
लोक  मी परतणार असे गृहीत धरत आहेत मात्र रोज घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याचा मी आनंद घेत आहे. दररोज वेगवेगळ्या हॉटेल्सच्या खोल्या किंवा विमानतळ गाठण्यापेक्षा स्वत:च्या घरी परतण्यासारखा आनंद नाही, असे हसीने सांगितले. मला हवे तसे आयुष्य जगायला मिळत आहे आणि मला हवे तेव्हाच क्रिकेट सोडायला मिळाले या दोन गोष्टींमुळे मी समाधानी आहे.
भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल असून, त्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भारतासारखा खडतर दौरा करण्याने खेळाडू तावून सुलाखून एक अधिक परिपक्व खेळाडू म्हणून बाहेर पडतो, असेही त्याने सांगितले.

Story img Loader