‘किंग खान’ म्हणून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याचा आज ५३वा वाढदिवस. विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका त्याने साकारल्या आणि अजूनही साकारत आहे. त्याच्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या कायम पसंतीस उतरल्या. आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर क्रिकेट जगतातदेखील त्याचे प्रचंड चाहते आहेत.

आपल्या फलंदाजीने २४ वर्षे क्रिकेटवर सत्ता गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील याला अपवाद नाही. सचिनदेखील शाहरुखचा चाहता आहे. शाहरुखच्या वाढदिवशी त्याने एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने किंग खानला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखने साकारलेल्या भूमिकेचे नाव हे राज किंवा राहुल असायचे. आणि त्याचे ते चित्रपट हमखास ‘हिट’ व्हायचे. या संदर्भातच सचिनने ट्विट केले आहे. ‘ राज आणि राहुल हे शाहरुख नसता, तर राज आणि राहुल (या व्यक्तिरेखा) तितके रुबाबदार असू शकले नसते’, असे ट्विट करत त्याने शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय, इतर क्रिकेटपटुंनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader