Harbhajan Singh on Najam Sethi: आशिया चषक २०२३मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा स्थितीत आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण वादाचा मुद्दा बनला आहे. मात्र, पीसीबीने एसीसीवर टीका करणे सुरूच ठेवले आहे. नुकतेच पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी एक वक्तव्य केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “भारत पाकिस्तानशी खेळताना घाबरतो.” यावर, आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने सडेतोड प्रत्युतर दिले आहे. सुपर-४ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितले की, “नजम सेठी सध्या कोणती नशा करतात, हे माहीत नाही. भारत पाकिस्तानला घाबरतो, असे ते कोणत्या तथ्यावर म्हणत आहेत ते मला कळत नाही. कृपया नजम सेठी यांना भारत-पाकिस्तान सामन्यांचे संपूर्ण रेकॉर्ड द्या. भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरुद्ध खेळला तेव्हा भारताने त्यांना सर्वाधिक वेळा पराभूत केले आहे, जे सध्याच्या पाकिस्तान क्रिकेटच्या स्थितीचा विचार करता अगदीच हास्यास्पद आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: “जे सूर्या करू शकतो ते रोहित-विराट…”, हरभजनने सूर्यकुमार यादवच्या विश्वचषक निवडीबाबत केले सूचक विधान

तुम्हाला पाहिजे तिथे खेळा, आम्ही नक्की हरवू – हरभजन

पुढे बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “सेठी म्हणतात की भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही कारण भारत त्यांना घाबरतो. टीम इंडिया कोणाशीही खेळायला घाबरत नाही. ते कुठून आले माहीत मला माहिती नाही. मात्र, हवामानाचा अंदाज बरोबर होता की नाही, हे कोणीच नीट सांगू शकत नाही. कारण, याबाबत ज्या संस्था अंदाज वर्तवतात त्यांचे देखील खूपवेळा ते चुकतात. त्यांचा चुकून बरोबर आला आहे पण बॉस, या आणि तुम्हाला पाहिजे तिथे खेळा, आम्ही पाकिस्तानला नक्की हरवू.”

नजम सेठी हे भारताबाबत काय म्हणाले होते?

पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केले की, “बीसीसीआय किंवा एसीसीने आज पीसीबीला कळवले की त्यांनी पावसाच्या अंदाजामुळे पुढील भारत-पाक सामना कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तासाभरात त्यांनी आपला विचार बदलला आणि कोलंबो हेच असेल असे त्यांनी घोषित केले. नक्की काय चालू आहे? भारताला पाकिस्तानशी खेळण्याची आणि पराभूत होण्याची भीती वाटते का? पाहा पावसाचा अंदाज!” पाकिस्तानने सुपर-४मधील त्यांचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध ७ गडी राखून जिंकला असून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यात भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

Story img Loader