भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. हरभजनने गेल्याच महिन्यात आपण सर्व प्रकारांमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून त्याने आतापर्यंत कधीही भाष्य किंवा खुलासा न केलेले मुद्दे समोर आणले आहेत. नुकतंच त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप करत अचानक संघाबाहेर काढल्यानंतर कारणही सांगितलं नव्हतं असा खुलासा केला होता.
हरभजनला २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीतही समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. तसंच २०१५ च्या वर्ल्ड कप टीमचाही भाग नव्हता. २०१६ मध्ये भारतात झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये हरभजनला सहभागी करण्यात आलं होतं, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हरभजनने संघात स्थान न मिळाल्यानंतर धोनी आणि बीसीसीआयवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा आपली २०१५ वर्ल्डकपमध्ये विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि गंभीरसोबत खेळण्याची इच्छा होती असं म्हटलं. ती संधी मिळाली नाही याबद्दल त्याने खेद व्यक्त केला आहे.
एएनआयशी बोलताना हरभजनने सांगितलं की, “माझे सहकारी विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि गंभीरसोबत आणखी एक वर्ल्डकप सोबत खेळण्याची संधी मिळायला हवी होती. जेव्हा मी ४०० विकेट्स घेतले तेव्हा मी ३१ वर्षांचा होतो आणि २०११ मध्येही मी ३१ वर्षांचा होतो. मी चांगली कामगिरी करत होतो आणि खरं तर संघात सामील अनेकांपेक्षा जास्त फिट होतो”.
हरभजनने कानशिलात लगावलेल्या श्रीसंतची हरभजनच्या निवृत्तीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “तू कायमच…”
२०११ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू २०१५ च्या वर्ल्डकपसाठीही तितकेच फिट होते असा हरभजनचा दावा आहे. “मला माहिती नाही काय झालं आणि यामागे कोण होतं ते..पण जे झालं ते झालं. त्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाही. पण हो विरु, युवी आणि गंभीरसोबत आणखी एक वर्ल्डकप खेळता आला असता तर बरं झालं असतं,” असं हरभजनने म्हटलं आहे.
“२०१५ वर्ल्डकपचा भाग होण्यासाठी आम्ही फिट होतो, पण तसं झालं नाही. हे असं काही होतं जे आमच्या हातात नव्हतं, पण आम्ही जे काही केलं तसंच ज्या काही संधी मिळाल्या ते सर्व भारतीय क्रिकेटसाठीच होतं,” असं हरभजनने सांगितलं आहे.
पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “बीसीसीआयने दिलेल्या संधीबद्दल मी नेहमीच त्यांचा आभारी आहे. २०१२, २०१४, २०१४ मध्ये अनेकांनी आम्हाला संधी का दिली नाही याबाबत विचारणा केली होती ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कदाचित बीसीसीआय याचं उत्तर देऊ शकेल”.
“त्यावेळी अनेकांनी २०११ वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने या खेळाडूंनी संधी का दिली नाही असे प्रश्न विचारले. आम्ही त्यावेळी ३० वर्षांचे होणार होतो. मी ३१ तर विरुन ३१-३२ आणि युवी २९-३० वर्षांचा होता. तरीही आम्हाला वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली नाही हे थोडं आश्चर्यकारक आहे,” असं हरभजनने म्हटलं आहे.
हरभजन सिंगने १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने १०३ कसोटी सामने, २३६ एकदिवसीय सामने आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. हरभजन सिंग बराच काळ भारतीय संघाचा भाग होता. पण २०११ मधील वर्ल्डकपनंतर त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर फार कमी वेळा हरभजनला खेळण्याची संधी मिळाली.