भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने औपचारिकपणे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने मागील २३ वर्षांच्या खेळातील प्रवासाला निरोप देत असल्याचं ट्वीट करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने निवृत्ती घोषित करतानाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटमध्ये हरभजनने सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो असं म्हणत त्याच्या आयुष्यातील प्रत्येकाला धन्यवाद दिले.

हरभजन सिंग म्हणाला, “जलंधरची गल्ली ते भारतीय क्रिकेट संघापर्यंतचा मागील २५ वर्षांचा माझा प्रवास खूप चांगला होता. मी जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून मैदानात उतरलो तेव्हा तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली. त्यापेक्षा मोठी प्रेरणा माझ्या आयुष्यात दुसरी कोणती नव्हती. मात्र, आयुष्यात काही कठीण निर्णय घ्यावे लागतात अशी वेळ येते.”

“मी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून आज निवृत्ती घेत आहे”

“मला मागील काही वर्षांपासून एक घोषणा करायची होती. तो क्षण तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याची मी वाट पाहत होतो. मी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून आज निवृत्ती घेत आहे. खरंतर मनातल्या मनात मी निवृत्ती आधीच घेतली होती, मात्र याची घोषणा करू शकलो नाही. मागील काही काळापासून मी सक्रीय क्रिकेट खेळत नव्हतो. मात्र, कोलकाता नाईट रायडर्ससोबत काही निर्णय ठरला होता त्यामुळे आयपीएलमध्ये मी त्यांच्यासोबत होतो. या काळातच मी निवृत्तीचं ठरवलं होतं,” असंही हरभजनने नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

हरभजन सिंग म्हणाला, “प्रत्येक क्रिकेटरप्रमाणे मलाही भारतीय संघाच्या जर्सीतच अलविदा म्हणायचं होतं, मात्र नशिबाला वेगळंच काहीतरी हवं होतं. भारतीय संघ असो, पंजाबचा संघ असो, मुंबई इंडियन्स, सीएसके किंवा केकेआर असो मी ज्या संघात खेळलो तिथं मी माझा संघ सर्वोत्तम कामगिरी करावा यासाठी १०० टक्के क्षमतेने काम केलं.”

हेही वाचा : हरभजन सिंगकडून ‘ऑल टाईम टी२० इलेवन’ची घोषणा, आश्चर्य वाटेल अशा नावांचा समावेश

“मी माझ्या आयुष्यात इतकं जे काही करू शकलो त्यात माझे गुरू संत हरचरण सिंग यांच्या आशिर्वादानेच हे शक्य झालं. त्यांनी माझ्या आयुष्याला एक दिशा दिली. त्यांची प्रत्येक शिकवण माझ्या आयुष्याला पुढे नेईल. माझे वडील आणि आईने माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच देवाने मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सक्षम बनवलं. देवाने मला याच आई-बापाच्या पोटी जन्म द्यावा,” अशी प्रार्थना हरभजनने केली.

हरभजनने यावेळी आपल्या कामगिरीविषयी देखील माहिती दिली. तो म्हणाला, “क्रिकेटच्या करियरमध्ये मी कोलकात्यात हॅट्रिक घेतली तेव्हा पहिला आनंद मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा मी पहिला भारतीय खेळाडू बनलो. त्या कसोटी मालिकेत मी ३ सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या. तो आतापर्यंतचा विक्रम आहे. यानंतर २००७ चा टी-२० वर्ल्डकप आणि २०११ चा वर्ल्डकपमधील विजय माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. हे अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.”

“अंडर १४ ते इंडिया सिनियर आणि मग आयपीएलमधील सोबतचे आणि विरोधी संघातील सर्व खेळाडूंचे मी आभार मानतो. ज्यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली त्या प्रशिक्षक, ग्राऊंड्स मॅन, अंपायर, मीडिया अशा सर्वांचेच धन्यवाद. यासोबतच माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्या सर्व चाहत्यांचेही मी आभार मानतो,” असंही हरभजनने नमूद केलं.

Story img Loader