भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबद्दल खुलासा केला आहे. हरभजनने धोनीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले. धोनी गेली अनेक वर्षे आपला चांगला मित्र आहे, असे सांगितले. ४१ वर्षीय हरभजनने गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजनने २०१६मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या हरभजनने निवड समितीली लक्ष्य केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे कारकीर्द घसरली, असे भज्जीने सांगितले. धोनीबद्दल काही तक्रार आहे का, असे विचारले असता हरभजन म्हणाला, “नाही, अजिबात नाही. धोनीविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही. आम्ही दोघेही इतकी वर्षे चांगले मित्र आहोत. माझी बीसीसीआयकडे तक्रार आहे. त्यावेळच्या निवड समितीने माझ्या कामाला न्याय दिला नाही.”
हेही वाचा – “लीडर होण्यासाठी तुम्हाला…”, CAPTAINCY सोडण्याबाबत विराट कोहलीनं केला ‘मोठा’ खुलासा!
“जेव्हा जुने आणि महान खेळाडू संघात होते आणि चांगली कामगिरी करत होते, तेव्हा नवीन खेळाडूंना संघात आणण्याची काय गरज होती? मी या गोष्टीला विरोध केला होता. मला एवढेच सांगायचे होते, की २०१२ नंतर बऱ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकल्या असत्या. वीरेंद्र सेहवाग, मी, युवराज सिंग, गौतम गंभीर, आम्ही सर्वजण आयपीएलमध्ये सक्रियपणे खेळत असल्यामुळे भारतासाठी खेळून निवृत्त होऊ शकलो असतो. २०११ विश्वचषक चॅम्पियन खेळाडू पुन्हा एकत्र खेळू शकले नाहीत! का! २०१५च्या विश्वचषकात काही मोजकेच खेळले, का?”, असा सवालही हरभजनने उपस्थित केला.
२०११च्या वर्ल्डकपनंतर हरभजन आणि धोनीमध्ये संबंध बिघडल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात हरभजनची कामगिरी फारशी खास नव्हती, ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.