Harbhajan Singh Blasts At Inzamam Allegation: गेल्या काही दिवसात, वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांच्यासह माजी भारतीय क्रिकेटपटूंनी एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर उघडपणे टीका केली आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यात पाकिस्तान बाद झाला होता. भारतीय क्रिकेटपटूंनी केलेली टीका ही बोचरी असली तरी ती केवळ खेळापुरतीच मर्यदित होती. पण याउलट पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी अनेक विचित्र दावे व चुकीचे आरोप करून पातळी सोडून भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. अब्दुल रझाकने ऐश्वर्या रायचे नाव घेत केलेली टीका चर्चेत असताना आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये इंझमाम-उल-हकने हरभजन सिंग पाकिस्तान क्रिकेट संघासह मौलाना तारिक जमीलच्या तालमीत सहभागी व्हायचा असे सांगितले होते.
व्हिडिओमध्ये, इंझमामने दावा केला आहे की, हरभजन हा पाकिस्तान क्रिकेट संघासह नमाज पठण करण्यासाठी मौलाना तारिक जमीलच्या उपदेश वर्गांना जात असे. एका दौर्यादरम्यान, इंझमामने इरफान पठाण, झहीर आणि मोहम्मद कैफला नमाज पठणात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. इंझमामने असेही सुचवले की, माजी भारतीय फिरकीपटू मौलानांच्या उपदेशाने इतका प्रभावित झाला होता की त्याने धर्मांतर करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.
“मौलाना तारिक जमील आम्हाला रोज भेटायला यायचे. आमच्याकडे नमाजासाठी खोली होती. प्रार्थनेनंतर ते आमच्याशी बोलायचे. एक-दोन दिवसांनी आम्ही इरफान पठाण, झहीर खान आणि मोहम्मद कैफ यांना प्रार्थनेसाठी आमंत्रित केले. माझ्या लक्षात आले की आणखी २ – ३ भारतीय खेळाडूही सामील व्हायचे; ते नमाज पठण करत नव्हते पण मौलाना देणारा उपदेश ऐकायचे. तेव्हाच हरभजन एकदा मला म्हणाला, ‘माझं मन सांगतंय (मौलाना) जे काही बोलेल ते मला मान्य व्हावं, मग मी त्याला म्हणालो, ‘मग तू ते ऐकत जा. तुला कोण अडवतंय?, मग, त्याने उत्तर दिले, ‘मी तुला पाहतो आणि मग मी थांबतो. तुझं आयुष्य तसं नाहीये’. त्यामुळे आपणच आपला धर्म पाळत नाही. हा आमचा दोष आहे.”
दरम्यान, या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना हरभजन सिंगने ट्विटर (X) वर आपली नाराजी व्यक्त केली. एका ट्विटमध्ये हरभजनने लिहिले, “हा माणूस कोणती नशा करून बोलतोय? मी भारतीय असल्याचा आणि शीख असल्याचा मला अभिमान आहे, ही फालतू माणसं काहीही बरळतात.
Video: माजी पाक कर्णधाराच्या स्फोटक वक्तव्यावर भडकला हरभजन
हे ही वाचा<< IND vs NZ: हरणारा संघ कमावणार ‘इतके’ कोटी! विश्वचषकात कोणत्या संघाने किती कमाई केली, पाहा तक्ता
दरम्यान, हरभजन भारतीय संघासह पाकिस्तानच्या अनेक दौऱ्यांवर गेला होता आणि संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्याशीही त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या वर्षाच्या सुरूवातीस, हे दोघे लीग क्रिकेट दरम्यान एका हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये देखील दिसले होते, यात त्यांनी त्यांच्या भूतकाळातील संघर्षांमधील काही अविस्मरणीय क्षणांबद्दल सांगितले होते. दुसरीकडे, इंझमामने २०२३ च्या विश्वचषकात संघाच्या निराशाजनक मोहिमेनंतर अलीकडेच पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ता पद सोडले होते.