वृत्तसंस्था, नवी दिल्ली/सिडनी
‘सुपरस्टार’ संस्कृती भारतीय क्रिकेटसाठी हानीकारक ठरत आहे. पूर्वपुण्याईऐवजी अलीकडच्या काळातील कामगिरी लक्षात घेऊनच संघनिवड झाली पाहिजे, असे परखड मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मांडले. तसेच बड्यांना वेगळी वागणूक देणे थांबवून संघहिताचे निर्णय घेतले तरच भारतीय क्रिकेट पुढे जाईल, असे माजी अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला.
नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताने दशकभरापासून प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकावर राखलेला कब्जाही गमावला. त्याआधी भारताला मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ अशा अपयशाला सामोरे जावे लागले होते. या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर माजी खेळाडूंकडून भारतीय संघावर ताशेरे ओढले जात आहेत.
‘‘भारतीय क्रिकेटमध्ये ‘सुपरस्टार’ संस्कृती निर्माण झाली आहे. मात्र, आपल्याला ‘सुपरस्टार’ची नाही, तर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. तसे झाले तरच भारतीय संघ यशस्वी ठरू शकेल,’’ असे हरभजन म्हणाला.
‘‘भारतीय संघ काही महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेसाठी कोणाला संघात ठेवले जाणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या खेळाडूंनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे अशांनाच संघात स्थान मिळायला हवे. तुम्ही पूर्वपुण्याईच्या आधारे संघनिवड करू शकत नाही. ‘बीसीसीआय’ आणि निवड समितीने आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ‘सुपरस्टार’ भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे,’’ असे हरभजनने नमूद केले.
असेच काहीसे मत इरफान पठाणनेही मांडले. ‘‘भारतीय क्रिकेटला पुन्हा प्रगतिपथावर आणण्यासाठी सर्वप्रथम ‘सुपरस्टार’ संस्कृती थांबली पाहिजे. संघहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी स्वत:च्या आणि संघाच्या कामगिरीत कशी सुधारणा करता येईल, याचाच विचार केला पाहिजे. या मालिकेपूर्वीही भारतीय संघातील बड्या खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळण्याची संधी होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. आता ही संस्कृती बदलणे आवश्यक आहे,’’ असे पठाण म्हणाला.
कोहलीवर टीका
कोहलीला गेल्या काही वर्षांपासून लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून लय मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. मात्र, कोहलीने २०१२ नंतर देशांतर्गत सामना खेळलेला नाही. याकडे पठाणने लक्ष वेधताना त्याच्यावर टीका केली. तसेच कोहलीच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. ‘‘कोहलीचे भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे यात दुमत नाही. मात्र, तुम्ही वारंवार एकच चूक करून बाद होत असाल, तर तुमची पाठराखण कशी केली जाऊ शकते? गेल्या पाच वर्षांत कोहलीला ३० ची सरासरीही राखता आलेली नाही. असा अनुभवी खेळाडू तुम्हाला हवा आहे का? त्यापेक्षा युवा खेळाडूला संधी द्या,’’ असे पठाण म्हणाला.
फलंदाजांच्या अपयशाचा फटका गांगुली
बॉर्डर-गावस्कर करंडकात भारतीय संघाला फलंदाजांच्या अपयशाचा सर्वांत मोठा फटका बसला, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. ‘‘कसोटी सामने जिंकायचे झाल्यास तुम्ही चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. मात्र, भारतीय संघाला त्यात अपयश आले. तुम्ही १७०-१८० धावा करून विजय मिळवू शकत नाही. ३५०-४०० धावा केल्या तरच तुम्हाला संधी असते. या अपयशाला कोणा एका फलंदाजाला जबाबदार धरता येणार नाही. प्रत्येकानेच योगदान देणे आवश्यक असते,’’ असे गांगुली म्हणाला.