आशिया चषक स्पर्धा २०२३ च्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आमनेसामने आलं आहे. दोन्ही देशांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. भारताने आधीच जाहीर केलं आहे की, “कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही.” यामुळे पाकिस्तान भारताच्या भूमिकेवर संतापला असून या स्पर्धेचं यजमानपद स्वतःकडे राखण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. पाकिस्तानला आशा आहे की, ते या स्पर्धेचं आयोजन करू शकतात.
आशिया चषक स्पर्धा कुठे होणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याने या वादात उडी घेतली आहे. तसेच त्याने कठोर शब्दात पाकिस्तानला सुनावलं आहे. भज्जी म्हणाला की, “भारताने पाकिस्तानला जाऊ नये. कारण तिथले लोक त्यांच्या देशात सुरक्षित नाहीत.”
हरभजन म्हणाला की, “आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात झाली तर भारताने पाकिस्तानला जाण्याची जोखीम पत्करू नये. कारण ते सुरक्षित नाही. तिथले लोक त्यांच्या देशात सुरक्षित नसताना आपण ती जोखीम का पत्करायची?”
हे ही वाचा >> IPL 2023: आरसीबीला मिळाला विल जॅकचा बदली खेळाडू; न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची केली निवड
पाकिस्तानची भारताला धमकी
आशिया चषक स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी खेळवली जावी, अशी मागणी भारताने केली आहे. यामुळे पाकिस्तान भारतावर संतापला. पाकिस्तानी बोर्डाने म्हटलं की, “जर पाकिस्तानकडून आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद काढून घेतलं तर आम्ही भारतात होणाऱ्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.” एकप्रकारे पाकिस्तानी बोर्डाने धमकीच दिली आहे.