भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने मुंबईतील त्याचे आलिशान अपार्टमेंट १७.५८ कोटी रुपयांना विकले आहे. ही माहिती Zapkey.com वर उपलब्ध दस्तऐवजातून आली आहे. हे अपार्टमेंट जेबीसी इंटरनॅशनलने विकत घेतले आहे आणि हा करार १८ नोव्हेंबर झाला होता. या अपार्टमेंटसाठी खरेदीदाराने सुमारे ८८ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, हरभजन सिंगचे हे अपार्टमेंट अंधेरी पश्चिम येथील रुस्तमजी एलिमेंट्सच्या ९व्या मजल्यावर आहे आणि अपार्टमेंटचे क्षेत्रफळ सुमारे २९०० स्क्वेअर फूट आहे. हरभजनने डिसेंबर २०१७ मध्ये हे अपार्टमेंट विकत घेतले होते आणि मार्च २०१८ मध्ये नोंदणी केली होती. तेव्हा त्याची किंमत १४.५ कोटी रुपये होती.
हेही वाचा – ‘‘भारताची जुनी जर्सी पुन्हा आणायची वेळ आलीय”, वसीम जाफरचा ‘आगळा-वेगळा’ सल्ला; वाचा कारण
Zapkey.com चे सह-संस्थापक संदीप रेड्डी म्हणाले की, रियल्टी मार्केटमध्ये करोनापासून तेजी दिसून येत आहे आणि लक्झरी सेगमेंटमध्ये अल्ट्रा लक्झरी मालमत्तांची वेगाने विक्री होत आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लोअर परळमधील वर्ल्ड टॉवर्समध्ये २६१८ स्क्वेअर फूट असलेले एक अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये होती. त्यासाठी त्याने २४ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क भरले होते.
हरभजन सध्या समालोचनात हात आजमावत आहे आणि तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत क्रिकेटशी संबंधित विषयांवर मत मांडतो. त्याने अलीकडेच अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. रहाणेने पुन्हा लय मिळवली नाही, तर तो अडचणीत येऊ शकतो, असे तो म्हणाला होता. कारण त्याची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू तयार आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादव यांचे नाव आघाडीवर आहे. उद्यापासून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.