भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात त्याने राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे. या दरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाबाबत खुलासा केला आहे. विशेष म्हणजे त्याचे खरे प्रेम पत्नी नसून दुसऱ्याच दोन व्यक्ती आहेत.
हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. हरभजन सिंग आणि गीता यांना एक मुलगी आणि मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव हिनाया हीर तर मुलाचे नाव जोवन वीर सिंग आहे.
‘प्युअर लव्ह’ या कॅप्शनसह पोस्ट शेअर केलेल्या या व्हिडीओला उदित नारायण यांच्या आवाजातील एक गाणेही लावण्यात आले आहे. उदित यांच्या ‘तू मेरा दिल तू मेरी जा’, या गाण्यावर भज्जी आपली मुलगी आणि मुलासोबत फिरताना दिसत आहे. या व्हिडीओला काही तासांत हजारो लोकांनी लाईक केले आहे.
हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. लिजेंड्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात आम आदमी पार्टीचा राज्यसभा सदस्य म्हणून त्याने खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार हरभजन सिंगने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी मतदानही केले होते.