Harbhajan Singh slams MS Dhoni fan: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर आयसीसीच्या सर्व फॉरमॅटमधील ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये चाहते म्हणत आहेत की, धोनी कर्णधार असता तर कदाचित हा निकाल लागला नसता. अशा आशयाच्या एका ट्विटला हरभजन सिंगने प्रत्युतर दिले.
धोनी कर्णधार असता तर कदाचित असा निकाल लागला नसता, असे चाहते म्हणू लागले. मात्र, ही विचारसरणी काही दिग्गज भारतीय खेळाडूंना आवडलेली नाही. यामध्ये अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगच्या नावाचा समावेश आहे. रविवारी टीम इंडियाच्या पराभवानंतर त्याने एका यूजरला उत्तर देताना आपली नाराजी व्यक्त केली.
युजरने धोनीचे कौतुक करणारे ट्विट केले –
टीम इंडियाच्या पराभवानंतर एका यूजरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “कोच नाही, कोणता स्टाफ नाही, वरिष्ठ खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला..यापूर्वी कधीही एकाही सामन्यात कर्णधार नाही, या व्यक्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कर्णधार झाल्यानंतर ४८ दिवसांत टी-२० विश्वचषक जिंकला.”
त्यावर हरभजन सिंगने उत्तर दिले –
हेही वाचा – IND vs AUS WTC Final: ‘मला नाही, कोहलीला विचारा…’; विराटच्या खराब शॉटवर सुनील गावसकरांची प्रतिक्रिया
या ट्विटला हरभजन सिंगने उत्तर दिले, “होय जेव्हा हे सामने खेळले गेले तेव्हा हा तरुण देशासाठी एकटाच खेळला.. बाकीचे १० खेळले नाहीत.. म्हणूनच त्याने एकट्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली.. गंमत म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशाने विश्वचषक जिंकला की ऑस्ट्रेलिया किंवा या देशाने विजेतेपद पटकावले अशी चर्चा होते, पण भारत जिंकला की कर्णधार जिंकला असे म्हणतात..हा एक सांघिक खेळ आहे..आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो.”
गंभीरनेही हरभजन सिंगसारखे वक्तव्य केले –
डब्ल्यूटीसीच्या पराभवानंतर गंभीरनेही असेच विधान केले होते. तो म्हणाला, “मला वाटते की बहुतेक लोक असे म्हणणार नाहीत, परंतु हे सत्य आहे आणि जगासमोर आले पाहिजे. आपल्या देशाला संघाचे वेड नाही, तर काही निवडक खेळाडूंचे वेड आहे. आपण खेळाडूंना संघापेक्षा जास्त मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये हा संघ मोठा आहे, वैयक्तिक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही बऱ्याच काळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.”