Harbhajan Singh Statement on Team India and Gautam Gambhir coaching: भारतीय संघाची टी-२० विश्वचषक २०२४च्या विजयानंतर कामगिरी सातत्याने खालावली आहे. भारताच्या या कामगिरीवर हरभजन सिंगने चिंता व्यक्त केली. भारताने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले होते. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कसोटी फॉरमॅटमध्ये खेळताना भारतीय संघाच्या कामगिरीत अचानक घसरण झाली आहे. हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे टीम इंडियाची कसोटीतील खालावलेली कामगिरी आणि भारतीय संघाच्या टीम निवडीबाबतही वक्तव्य केलं आहे. हरभजनच्या या व्हीडिओमधील वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलताना हरभजन म्हणाला, “राहुल द्रविड प्रशिक्षक होते तेव्हापर्यंत सर्व काही ठीक होतं. टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि सर्व काही ठीक होतं. पण अचानक काय झालं?” हरभजन सिंगने गौतम गंभीरच्या कार्यकाळात कोचिंगमध्ये झालेल्या बदलानंतर निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. हरभजन सिंग म्हणाला की, टीम इंडियाने टी-२० मध्ये आपला दबदबा कायम ठेवला, पण कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी सातत्याने घसरली.
टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत ०-३ आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करण्याची दशकभरातील ही पहिलीच वेळ आहे. हरभजन सिंग म्हणाला, “गेल्या सहा महिन्यांत संघ श्रीलंकेकडून हरला, न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आणि आता ऑस्ट्रेलियात ३-१ ने हरलो. असं दिसतंय की सगळं विस्कळीत झालं आहे.”
भारताचे वरिष्ठ खेळाडू बॉर्डर गावस्कर मालिकेत पूर्णपणे फेल ठरले आणि याच फटका संघाला बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संपूर्ण कसोटी मालिकेत खराब फलंदाजीचे परिणाम भारताला भोगावे लागले. सर्वात खराब कामगिरी भारताचा अव्वल फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माची होती. या दौऱ्यात रोहित शर्माने ५ कसोटी डावात केवळ ३१ धावा केल्या. त्याचबरोबर विराट कोहलीही टीम इंडियासाठी खलनायक ठरला. या कसोटी मालिकेतील ९ डावांमध्ये विराट कोहलीने २३.७५ च्या खराब सरासरीने १९० धावा केल्या आहेत. स्टार खेळाडूंचा दर्जा असलेल्या खेळाडूंना मागे टाकून पुढे गेलं पाहिजे, असा सल्ला हरभजन सिंगने भारतीय संघ व्यवस्थापनाला दिला आहे.
रेप्युटेशन बघूनच खेळवायचं तर कपिल देवला संघात घ्या, हरभजन सिंगची बोचरी टीका
हरभजन सिंगच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापनाने निवड करताना खेळाडूंचा फॉर्म आणि क्षमतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हरभजन सिंग म्हणाला, “प्रत्येक खेळाडूची स्वतःची प्रतिष्ठा असते. असे असेल तर कपिल देव, अनिल कुंबळे किंवा भारताचे सर्वात मोठे मॅचविनर खेळाडूंना देखील संघात सामील करा. बीसीसीआय आणि निवड समितीने याकडे लक्ष द्यावे. भारताने सुपरस्टार खेळाडू संस्कृती संपवली पाहिजे.”
हरभजन सिंगने अभिमन्यू इश्वरन आणि सर्फराझ खान यांसारख्या आश्वासक खेळाडूंना संधी न दिल्यामुळे टीका केली, जे संघाचा भाग होते परंतु खेळू शकले नाहीत. हरभजन म्हणाला, “अभिमन्यू ईश्वरनला या दौऱ्यावर संघात सहभागी केले होते, पण तो खेळला नाही. त्याला संधी दिली असती तर तो टीम इंडियासाठी चांगला खेळाडू ठरू शकला असता. सर्फराझबाबतही तेच झालं. जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्याने (इंग्लंडला) जावे. प्रतिष्ठेच्या आधारावर खेळाडूंची निवड करू नये. आता निर्णय निवडकर्त्यांचा आहे की कोणाला संधी द्यायची.”