PAK vs SA Match Highlights: शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२३ च्या सामन्यादरम्यान क्रिकेटचा ‘अंपायर कॉल’ कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला. रॅसी व्हॅन डर ड्युसेनला डीआरएसने तीनपैकी दोन ‘अंपायर कॉल’ दाखवून आऊट दिले तेव्हा दक्षिण आफ्रिकेला या कायद्याचा फटका बसला तर मैदानावरील पंचाच्या नाबाद निर्णयामुळे तबरेझ शम्सी एलबीडब्लू शॉटनंतर बचावल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. यामुळे भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने ‘अंपायर कॉल’ कायद्यावर टीका केली आहे.
केशव महाराजने चौकार मारून दक्षिण आफ्रिकेच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर हरभजनने ट्विट करत म्हटले की, “खराब अंपायरिंग आणि चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानला हा खेळ महागात पडला.. @ICC ने हा नियम बदलायला हवा.. चेंडू स्टंपला आदळत असेल तर अंपायरने आऊट दिला काय की नॉट आउट काही फरक पडत नाही.. नाहीतर तंत्रज्ञानाचा उपयोग काय?” या निकालामुळे दक्षिण आफ्रिकेने नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात काय झालं?
दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९व्या षटकात अंपायर पॉल रीफेलने व्हॅन डर डुसेनला बाद केले. त्याने रिव्ह्यूची मागणी केली असता बॉल ट्रॅकिंगने दोन पॅरामीटर्सवर ‘अंपायरचा कॉल’ घेण्यास सांगितले. मैदानावर त्याला आऊट देण्यात आल्याने थर्ड अंपायरला निर्णय बदलण्याची परवानगी नव्हती. आता या स्थितीत जर बॉल ट्रॅकिंगने दिसले असते की बॉल स्टंपच्या बाहेर डसेनला लागला किंवा स्टंप पूर्णपणे उडून वेगळा झाला तर कदाचित निर्णय बदलताही आला असता पण दोन्ही गोष्टी नसल्याने डुसेनला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
अंपायरच्या कॉलची दुसरी घटना सामना संपताना दिसून आली. शम्सीला अंपायर अॅलेक्स वॉर्फ यांनी मैदानावर नॉट आऊट दिले. डीआरएसने दाखवले की चेंडू स्टंपला चिकटत होता पण चेंडू निश्चितपणे स्टंपवर आदळला असेल याची खात्री नसल्याने, अंपायर कॉलनुसार निर्णय देण्यात आला.
हरभजन सिंग ट्वीट
हे ही वाचा << आज AUS vs NZ चा निकाल ठरवू शकतो पाकिस्तानचे भविष्य; बाबर आझमचा संघ टॉप ४ मध्ये पोहोचण्याचं गणित पाहा
दरम्यान, शम्सीच्या डीआरएस निर्णयावर केलेल्या ट्विटनंतर, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने डुसेनला बाद देण्यावरून हरभजनला प्रश्न केला असता त्याचे म्हणणे असे होते की, आयसीसी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवू शकत नाही. एकत्र मंडळाने तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवावा किंवा पंचांच्या निर्णयानुसार जावे. त्याच्या मते, डीआरएसने बॉल आदळताना किंवा स्टंपला क्लीप केल्याचे दाखवले असेल तर बाद घोषित करणेच योग्य आहे.