भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्या विवाह सोहळ्यात त्याच्या सुरक्षेसाठी नियोजित करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनीच(बाऊन्सर्स) राडा घातला. भज्जीच्या विवाह सोहळ्याचे वार्तांकन करणाऱया पत्रकारांशी त्याच्या सुरक्षारक्षकांनी शुल्लक कारणावरून वाद घालून कॅमेरांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भज्जीच्या चार सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.

हरभजनचा गीतासोबत गुरूवारी मोठ्या थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. विवाहाच्या पारंपारिक विधीनंतर गृहप्रवेशाच्या विधीवेळी छायाचित्रे टीपण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. मात्र, सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना फोटो टीपण्यास विरोध केला आणि त्यांचे कॅमेरे हिसकावून तोडून टाकले. इतकेच नाही तर सुरक्षारक्षकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा पत्रकारांनी केला आहे.

हरभजनच्या सुरक्षारक्षकांच्या या मनमानीचा निषेध करत पत्रकारांनी हरभजनच्या घरासमोर धरणं आंदोलन सुरू केले. अखेर हरभजनने स्वत:हून पुढे येऊन झालेल्या प्रसंगाबद्दल माफी मागितली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्वरित हरभजनच्या चार सुरक्षारक्षकांना अटक करून कारवाईचे आश्वासन दिले.

Story img Loader