भारतीय संघातील दोन उत्साही खेळाडूंची नावे विचारल्यास कोणीही सहज सांगेल की युवराज सिंग आणि हरभजन सिंग. या दोघांच्या मैत्रीचे किस्से चाहत्यांनी खूप वेळा ऐकले आहेत. वेगवेगळ्या मुलाखतीत या दोघांनी एकमेकांची अनेक गुपितं उघड केली आहेत. तसेच दोघे एकत्र असताना या दोघांनी एकमेकांची टेर खेचण्याची संधी कधीही सोडलेली नाही. असाच एक प्रकार ट्विटरवर झाला. आणि या ट्विटरच्या पिचवर हरभजनच्या फिरकीपुढे युवराजची विकेट पडली.

झाले असे की वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे गेले काही दिवस मुंबईकर कोड्यात पडला आहे. सोमवारीदेखील अशाच प्रकारे वादळी वारा आणि जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अलिखित नियमानुयासार, आईंक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यावेळी युवराज सिंग हा त्याच्या बांद्रयातील घरी होता. आणि त्यावेळी या सर्व कारणांमुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला. सुमारे तासभर युवराजने वीज परत येण्याची वाट पहिली. पण पाऊस काही थांबला नाही आणि वीजपुरवठाही लवकर सुरळीत होऊ शकला नाही.

अखेर कंटाळून युवराजने ट्विटरचा आधार घेतला. ‘गेले तासभर वांद्रे परिसरात वीज नाहीये. आम्हाला आमची वीज परत द्या’, असे ट्विट युवराजने केले. यावर अनेक लोकांनी विविध कमेंट केल्या. समदुःखी ट्विटर युझर्सने ट्विट रिट्विट केले.

मात्र या सगळ्या ट्विटमध्ये भाव खाऊन गेलं ते हरभजनचं ट्विट. युवराजच्या या ट्विटवर हरभजनने एक झकास कमेंट केली. ‘तुझ्याकडे वीजपुरवठा नाही. यात इतर कोणाची चूक नाही. बादशाह, विजेचे बिल वेळेवर भरत जा.’, असे अफलातून ट्विट त्याने केले. या ट्विटनंतर युझर्सने अक्षरश: या ट्विटलाही उचलून घेतले.

दरम्यान, हरभजनच्या या ट्विटवर युवराजने मात्र उत्तर देणे टाळले.

Story img Loader