बॉलिवूड निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीने पुढील चौकशी होईपर्यंत दोघांवरही बंदी घातलेली असून दोन्ही खेळाडू चौकशी समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी भारतात रवाना झाले आहेत. यानंतर भारतीय संघाच्या माजी खेळाडूंकडूनही या कारवाईचं समर्थन होताना दिसत आहे. फिरकीपटू हरभजन सिंहने या दोन्ही खेळाडूंवरील कारवाईचं स्वागत केलं आहे.
“अशा प्रकारच्या गोष्टी मित्र-परिवारासोबत चर्चा करतानाही आम्ही विचार करतो, या दोघांनीही एका कार्यक्रमात कॅमेऱ्यासमोर या गोष्टी उघडपणे बोलल्या. आता चाहत्यांचा क्रिकेटपटूंकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलू शकतो. लोकं विचार करतील की सचिन तेंडुलकरही असाच वागत असेल का, अनिल कुंबळेही असाच वागत असेल का?? हार्दिक पांड्याने अजुन भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमचं वातावरण कितीसं अनुभवलं आहे, काही वर्षांपूर्वी तो संघात आलाय. त्यामुळे बीसीसीआयने दोघांवरही केलेली कारवाई योग्यच आहे.” India TV वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन बोलत होता.