Gautam Gambhir on Asia Cup 2023: भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर २०११च्या विश्वचषकाबाबत अनेकदा वक्तव्य करताना दिसतो. विजयाचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला देण्याच्या बाबतीत गंभीर अनेकदा टोमणे मारताना दिसला आहे. त्याला २०११ विश्वचषक एकट्या धोनीने जिंकवला हे अजिबात मान्य नाही. तसेच काहीसे विधान त्याने आशिया चषक २०२३मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील कॉमेंट्रीदरम्यान केले होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रॉडकास्टरने कॅंडीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०१०चा सामना स्क्रीनवर दाखवला. या भारत-पाकिस्तान सामन्यात, ८३ धावा केल्याबद्दल गंभीरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्याबद्दल, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून गंभीर म्हणतो, “मी जिंकलो नाही तर हरभजन सिंग जिंकला म्हणजेच मी नव्हे तर हरभजनने जिंकवली होती मॅच. माझ्या आणि धोनीमध्ये भागीदारी झाली, पण जो शेवटच्या धावा करतो तो जिंकतो यावर माझा विश्वास आहे. जो विजयी धावा करतो तोच संघ जिंकतो.” त्याच्या या विधानाचा अर्थ २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याशी लावत चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

२०११च्या विश्वचषकातील विजयाचे श्रेय एम.एस. धोनीला देण्याच्या बाबतीत, गंभीरने अनेकदा विधान केले आहे. तो म्हणतो की, “वर्ल्ड कप फायनलच्या विजयामागे एका व्यक्तीचा हात नसून संपूर्ण संघाचे कष्ट आहेत.” धोनीला श्रेय देण्यावर त्यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. मात्र शनिवारी झालेल्या या आशिया चषकाच्या सामन्यात कॉमेंट्री करताना त्याने केलेल्या कमेंटची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs NEP: दुबळ्या नेपाळसमोर टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षण; कोहली, श्रेयस, इशान यांनी कॅचेस सोडताच रोहित भडकला; पाहा Video

अलीकडेच विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्याबाबत गंभीर म्हणाला होता की, “धोनीच्या विजयी षटकाराचे कौतुक होत आहे, पण युवराज सिंगच्या योगदानाबद्दल लोक फारसे बोलत नाहीत.” गंभीर पुढे म्हणाला होता की, “आम्ही २०११च्या विश्वचषकासाठी युवराजला पुरेसे श्रेय दिले नाही. अगदी झहीर खान, रैना आणि मुनाफ पटेल यांनाही मिळाले नाही. त्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या, पण आपण त्याच्याबद्दल बोलतो का, नाही. धोनीच्या षटकारांबद्दल मीडिया सतत बोलत असतो. तुम्हाला त्या व्यक्तींचे वेड लागले आहे, सगळेजण संघाला विसरत आहे.” त्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या आणि धोनीने ९१ धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल १२ वर्षानंतर भारतात वन डेचा विश्वचषक होत असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जिंकणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉकवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan won the match not me gambhirs u turn on dhoni he trolls on social media avw
Show comments