बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्ध ३ टी २० मालिका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी इंडिया ‘ए’ संघाची घोषणा केली. मात्र दोन्ही संघात धावांचा डोंगर रचणाऱ्या खेळाडूला डावलल्याने हरभजन सिंग याने संताप व्यक्त केला आहे. सौराष्ट्राचा फलंदाज शेल्डन जॅक्सन याची निवड न केल्याने हरभजनने आश्चर्य व्यक्त केलं आहे. मागच्या दोन रणजी पर्वात १६०० धावा करणाऱ्या जॅक्सनची निवड इंडिया ए संघातही केलेली नाही. यानंतर हरभजन सिंग याने संताप व्यक्त करत ट्वीट करून निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर पंजाबचा कर्णधार मनदीपबाबतही आपलं मत व्यक्त केलं आहे.
“२०१८-१९ रणजी पर्वात ८५४ धावा आणि २०१९-२० पर्वात ८०९ धावा करत संघाला चॅम्पियन बनवलं. यावर्षीही त्याचा चांगला फॉर्म आहे. तरीही इंडिया ए संघात निवड झाली नाही. निवडकर्ते जॅक्सन काय बोलू शकतात, की धावांव्यतिरिक्त त्याने काय केलं पाहीजे. म्हणजे त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळेल.” असं ट्वीट हरभजन सिंग यांनी केलं आहे. तसेच हॅशटॅग लाज असं लिहिलं आहे.
न्यूझीलंड मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी तरुण आणि भविष्यात भारतासाठी खेळणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. जॅक्सन वय सध्या ३५ वर्षे असल्याने डावलल्याचं बोललं जात आहे. मात्र असं असलं तरी निवड न केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जॅक्सनचा फॉर्म सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेतही कायम आहे. मागच्या तीन सामन्यात ६२, ७० आणि ७९ धावा केल्या आहेत. तर दोन वेळा नाबाद राहिला आहे. या व्यतिरिक्त जॅक्सननं ५० च्या सरासरीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५,६३४ धावा केल्या आहेत. तर लिस्ट एच्या ६० सामन्यात २,०९६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ६४ टी २० सामन्यात १,४६१ धावा केल्या आहेत. दुसरीकडे मनदीपचं वयही २९ वर्षे आहे आणि भारत ए संघासोबत खेळला आहे. पंजाबसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये मनदीपने चांगली कामगिरी केली आहे.
भारताचा टी २० संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी भारत ‘ए’ संघ: प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (विकेटकीपर), के गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी , उमरान मलिक, ईशान पोरेल, अर्जन नागवासवाला