कोणत्याही खेळात कारकीर्द करताना अल्प यशावर समाधानी न राहता आंतरराष्ट्रीय पदकाचे उच्च ध्येय ठेवावे व त्यास निष्ठा आणि परिश्रमाची जोड द्यावी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळतो असे ज्येष्ठ डेव्हिस प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नंदन बाळ यांनी सांगितले.
रोटरी क्लब (लक्ष्मी रोड) यांच्यातर्फे यंदाचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार ऑलिम्पिक नेमबाज गगन नारंग याला नंदन बाळ यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी रोटरी क्लब (३१३१ जिल्हा) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.गिरीश गुणे हे अध्यक्षस्थानी होते.
युवा खेळाडूंनी केवळ राष्ट्रीय स्तरावरील यशावर समाधान न मानता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला कसे यश मिळेल, याचा विचार केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे तसेच प्रत्येक खेळाडूने विनम्र राहिले पाहिजे असे सांगून बाळ म्हणाले, उत्तेजक, वादविवाद आदी अनिष्ट प्रवृत्तीपासून नारंग हा दूर राहिल्यामुळेच त्याला ऑलिम्पिक पदकापर्यंतच झेप घेता आली.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक थोडक्यात हुकल्यानंतर मी खूप निराश झालो होतो मात्र या पदकाची खंत मला सतत वाटत होती. तेव्हाच मी लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे ध्येय ठेवले व खूप मेहनत घेतली, त्यामुळेच माझे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार झाले असे नारंग याने सांगितले. तो पुढे म्हणाला, लंडन ऑलिम्पिकपूर्वी सरावात कोणाचाही व्यत्यय येऊ नये म्हणून मी प्रसारमाध्यमांपासून दूर राहिलो. जणूकाही मी भूमिगतच झालो होतो.
ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविल्यानंतर मला खूपच समाधान व आनंद झाला. ऑलिम्पिक पदकाचे अनोखे स्वप्न साकार झाले होते. आठ वर्षे या पदकासाठी मी अविरत झुंजत होतो. माझी झुंज अखेर यशस्वी ठरल्यामुळे माझ्यावरील मानसिक दडपण कमी झाले होते असे सांगून नारंग म्हणाला, नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता असणारे विपुल नैपुण्य महाराष्ट्रात उपलब्ध आहे हे लक्षात घेऊनच मी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत नेमबाजीची अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांमध्ये तेथील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पावणेदोनशे पदकांची लयलूट केली आहे.
क्रिकेटमुळे अन्य खेळांमध्ये भारताची पीछेहाट झाली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण क्रिकेट हा अतिशय व्यावसायिकरीत्या आयोजित केला जातो. अन्य खेळाच्या संघटकांनी संयोजनाबाबत क्रिकेटसारखा उंच दर्जा कसा गाठता येईल यादृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असेही नारंग याने सांगितले.
पुणेकरच झालोय – नारंग
गन फॉर ग्लोरी अकादमीनिमित्त मी पुण्यातच अधिक काळ असतो. त्यामुळे मी पुणेकरच झालो आहे. पुण्याचा जावई होण्यासही मला आवडेल, असे नारंग याने सांगितल्यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.