ज्ञानेश भुरे
पुणे : ‘संकेत पान टपरी’ ते राष्ट्रकुल पदक विजेता हा सारा प्रवास कठीण होता. या प्रवासात साथ देणारे आणि मला इथपर्यंत आणण्यासाठी खस्ता खाणारे आई-वडीलच माझ्यासाठी खरे प्रेरणास्रोत असल्याचे वेटलिफ्टिंगमधील राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता संकेत सरगरने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
स्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. त्यानंतर संकेतच्या हातावर लंडनमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली. संकेत सध्या मुंबईत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहे. ‘‘वडिलांना खेळाडू व्हायचे होते. परिस्थितीमुळे त्यांना जमले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे कष्ट मी पाहात होतो. कुटुंब चालवत असताना त्यांची होत असलेली ओढाताण बघत होतो. त्यामुळेच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि मी स्वत:ला त्या दृष्टीने घडवत गेलो,’’ असे संकेतने सांगितले.
सांगलीत पानाच्या दुकानात वडिलांना मदत करणारा संकेत त्यातून वेळ काढत अभ्यास, सराव याची सांगड घालत राष्ट्रकुल पदकापर्यंत पोहोचला. या प्रवासाबद्दल संकेत म्हणाला, ‘‘वडिलांनी दुकानाजवळच असलेल्या दिग्विजय व्यायामशाळेत मला घातले, वेटलिफ्टिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा मी यात लौकिक मिळवेन असे कधीच वाटले नव्हते. नाना सिंहासने आणि मयूर सिंहासने यांच्याकडून प्राथमिक धडे घेतले. प्रारंभीची दोन वर्षे तर अशीच गेली. स्पर्धा म्हणजे काय, हेदेखील माहीत नव्हते. जिल्हास्तराच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे, हेच मला कळत नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तर सोडा राष्ट्रीय स्तरापासूनही मी खूप दूर होतो. अपुऱ्या तयारीनेच मी विभागीय स्पर्धेत उतरलो. तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. परिपूर्ण तयारीशिवाय त्या स्पर्धेत कारकीर्दीतले पहिले रौप्यपदक मिळवले. तेव्हाच या खेळात कारकीर्द घडवण्याचा विचार निश्चित केला.’’
२०२०मध्ये संकेतने पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. त्यानंतर पुढील वर्षी दुसरे विजेतेपद मिळवले आणि आता आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत संकेतने मजल मारली. मात्र, संकेतचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ‘‘खेळातील प्रगती होत असली, तरी माझे दुकानावरील लक्ष कमी होणार नाही. पानाचे दुकान आणि सराव अशा दोन्ही गोष्टींची मला आता चांगली सवय झाली आहे. येथील कामानेच मला ताण सहन करायला, भावनांवर नियंत्रण ठेवायला आणि समोरच्याशी संवाद साधायला शिकवले, ते मी कधीच विसरणार नाही,’’ असेही संकेत म्हणाला.
‘‘स्पर्धेत सहभागाला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला ४९ किलो वजन गटात सहभागी होत होतो. त्यानंतर वजन गट वाढवून ५५ किलो वजन गटाची निवड केली. तेव्हापासून चांगले निकाल मिळू लागले. आता अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि आहाराचीही काळजी घेऊ लागलो,’’ असेही संकेत म्हणाला.
‘संकेत पान टपरी’ आता ‘राष्ट्रकुल पदक विजेता संकेत पान टपरी’ म्हणून ओळखली जाणार याचा मला अधिक आनंद आहे. कारण या पान टपरीनेच मला घडवल्याचे सांगायला संकेत विसरत नाही.
मेहनत कमी पडल्याची खंत
राष्ट्रकुल स्पर्धेत मेहनत कमी पडल्यामुळे सुवर्णपदक हुकल्याची खंत असल्याचे संकेत सांगतो. २०१८मध्ये दुकानात पान बांधताना गुरुराजा पुजारी याची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी बघतानाच पुढील वर्षी आपण या स्पर्धेत चमकायचे ही खूणगाठ मनाशी बांधली होती. ‘‘मेहनत घेशील, तर घडशील, हे वडिलांचे वाक्य सतत आठवत होते. त्यामुळे कठोर मेहनत घेत राष्ट्रकुलपर्यंत पोहोचलो आणि देशाचे स्पर्धेतील पहिले पदक मिळवले, याचा मला अभिमान वाटतो. अर्थात, सुवर्णपदक मिळाले असते, तर अधिक आनंद वाटला असता. क्लिन अँड जर्क प्रकारात शरीराचा तोल काहीसा ढळल्याने उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे सुवर्णपदकापासून वंचित राहिलो. आता उपचारांनंतर विश्रांती घेत आहे. नव्याने सरावाला सुरुवात करेन, तेव्हा देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे हेच माझे उद्दिष्ट असेल,’’ असे संकेत म्हणाला.