‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. BCCI च्या प्रशासकीय समितीने या बाबतची कारवाई केली. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेला मुकावे लागले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी मात्र त्यांची काही अंशी पाठराखण केली आहे.

हा प्रश्न विचारण्यात येईल याची मला कल्पना होतीच. माझं यावर असं मत आहे की प्रत्येक संघ हा चांगल्या खेळाडूंनी आणि चांगल्या माणसांनी तयार होतो. आपल्या जडणघडणीत आपण चुका करतो. पण त्यातूनच शिकून आपण अधिक परिपक्व होत जातो. त्यामुळे ते देखील आपल्या चुकांमधून शिकतील, असे ते म्हणाले.

मी त्यांची मुलाखत पाहिलेली नाही. पण छापून आलेल्या बातम्या मी वाचल्या आहेत. मी माझ्या कारकिर्दीत अनेक चुका केल्या आहेत. या चुकांमधूनच बोध घेऊनच मी माझ्यात सुधारणा करत गेलो. त्यामुळेच मी माझी कारकीर्द घडवू शकलो. हे दोघेदेखील त्यांनी केलेल्या चुकांमधून शिकतील आणि सुधारणा करतील अशी मला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच इतर खेळाडू देखील यातून बोध घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

मुलाखती दरम्यान त्या दोघांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण प्रशासकीय समितीचे मुख्य विनोद राय यांना पटलेले नव्हते. या दोन्ही खेळाडूंवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. मात्र BCCI च्या प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्या डायना एडलजी यांच्याशी चर्चा करून या दोघांवर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader