Hardik Pandya asked the West Indies Cricket Board to provide basic facilities: कॅरेबियन दौऱ्यावर टीम इंडियाला गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (सीडब्ल्यू) वर नाराज आहे. तिसऱ्या वनडेनंतर हार्दिक पांड्याने ते उघडपणे व्यक्त केले. पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने या समस्येकडे लक्ष द्यावे आणि त्याचे निराकरण करावे असे सांगितले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा २०० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, “आम्ही खेळलेल्या सर्वोत्तम मैदानांपैकी हे एक आहे. पुढच्या वेळी वेस्ट इंडिजमध्ये येताना परिस्थिती अधिक चांगली होईल, अशी आशा आहे. प्रवास करण्यापासून ते इतर गोष्टी सांभाळण्यापर्यंत, गेल्या वर्षीही काही अडचणी आल्या होत्या. मला वाटते की, वेस्ट इंडिज क्रिकेटने कोणत्याही संघाच्या दौऱ्यावर याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आलिशान सुविधा नकोत, किमान मूलभूत सुविधा तरी दिल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त येथे क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला.”

विमानाला झाला होता उशीर –

भारतीय क्रिकेटपटूंनी उड्डाणाच्या विलंबावर बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केली होती. त्रिनिदाद ते बार्बाडोस येथे रात्री उशिरा जाणार्‍या विमानाला जवळपास चार तास उशीर झाला होता, ज्यामुळे एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांना पुरेशी झोप घेता आली नाही. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर संघाने पाच विकेट्स गमावून ३५१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

हेही वाचा – ODI WC 2023: भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

वेस्ट इंडिजचा २०० धावांनी केला पराभव –

शुबमन गिलने ९२ चेंडूत ८५ धावा केल्या आणि फॉर्मात असलेल्या इशान किशन (६४ चेंडूत ७७) याच्या साथीने मोठ्या धावसंख्येचा टप्पा गाठला. संजू सॅमसननेही (४१ चेंडूत ५१ धावा) चांगली फलंदाजी केली. हार्दिकने आपल्या खेळीत पाच षटकार आणि चार चौकार लगावले. शार्दुल ठाकूरने ४ तर मुकेश कुमारने ३ बळी घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ ३५.३ षटकांत १५१ धावांवर गारद झाला. तसेच्या त्यांना २०० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि मालिकाही गमवावी लागली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya asked the west indies cricket board to provide basic facilities vbm
Show comments