Hardik Pandya bowling Babar Azam video has gone viral: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सपशेल अपयशी ठरला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या आशिया चषक सुपरफोरच्या हाय-प्रोफाइल सामन्यात हार्दिक पांड्याने बाबर आझमला बोल्ड केले. या मोठ्या सामन्यात हार्दिकच्या शानदार गोलंदाजीसमोर बाबर अवघ्या १० धावा करून बाद झाला. बाबर आझमला बोल्ड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हार्दिकने जगातील नंबर वन वनडे फलंदाजाला केले क्लीन बोल्ड –
हे दृश्य ११व्या षटकात दिसले. हार्दिक पांड्याने बाबर आझमसाठी ओव्हर द विकेट चेंडू टाकला. या षटकाचा चौथ्या चेंडूने पडताच काटा बदलला आणि गोळीच्या वेगाने आत येऊन यष्टीवर आदळला. बाबर या चेंडूवर स्वत:चा बचावाचा प्रयत्न करत होता, पण त्याला तो चेंडू समजला नाही आणि तो बाद झाला. त्याला या सामन्यात २४ चेंडूंत २ चौकारांसह १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
पाकिस्तानसाठी इमाम-उल-हक फखर जमानसह भारताविरुद्ध डावाची सलामी देण्यासाठी आले होते, मात्र जसप्रीत बुमराहने अवघ्या १७ धावांवर पाकिस्तान संघाला पहिला धक्का दिला जेव्हा त्याने ९ धावांच्या स्कोअरवर इमामला शुबमनकडे झेलबाद केले. यानंतर वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
भारताने पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे लक्ष्य –
भारताने पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ गडी गमावून 356 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२२ आणि लोकेश राहुलने १११ धावा केल्या. दोन्ही फलंदाज शतके झळकावून नाबाद राहिले. या दोघांपूर्वी रोहित शर्मा ५६धावा करून बाद झाला, तर शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.