ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या चांगलेच आनंदात आहेत. कारण २०१९ च्या विश्वचषकाआधी संघात केलेल्या प्रत्येक बदलांना किंवा प्रयोगांना या मालिकेत चांगले निकाल मिळाले आहेत. सध्याच्या भारतीय संघात अनेक खेळाडू आपली जागा पक्की करण्यासाठी धडपडत आहे. अजिंक्य रहाणेसारखा प्रतिभावान खेळाडू अजुनही वन-डे संघात पर्यायी सलामीवीराची भूमिका बजावतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ४ सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतरही टी-२० सामन्यांच्या संघात त्याची निवड झाली नाही. यावरुन भारतीय वन-डे संघात असलेल्या गुणवत्तेचा आपल्याला अंदाज आलाच असेल.

अवश्य वाचा – नागपूरच्या मैदानावर रोहितचा डंका, भारत विजयी; आयसीसी क्रमवारीत भारत पुन्हा ‘किंग’

सलामीच्या जोडीप्रमाणे मधल्या फळीत कोणत्या खेळाडूला संधी द्यायची हा देखील मोठा प्रश्न भारतीय संघाला सतावत होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांच्या या निर्णयाला मैदानात चांगली फळं मिळताना पहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या कामगिरीमुळे रवी शास्त्री हे पांड्यावर भलतेच खुश आहेत. हार्दिक पांड्या जगातल्या कोणत्याही मैदानावर षटकार खेचू शकतो, असं प्रशस्तीपत्रकच रवी शास्त्री यांनी पांड्याला दिलं आहे.

अवश्य वाचा – ते तंत्र अजुन मलाही उमगलं नाही – केदार जाधव

“हार्दिक हा सध्याच्या भारतीय संघातील मधल्या फळीतला सर्वात स्फोटक फलंदाज आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध उंच षटकार खेचण्याची कला त्याला अवगत आहे. युवराज सिंह फिरकीपटूंवर चांगलं आक्रमण करायचा, हार्दिकही त्याच पद्धतीने फिरकी गोलंदाजांवर तुटून पडतो.” पांड्याचं कौतुक करताना रवी शास्त्री बोलत होते. चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या खेळीने इंदूरच्या मैदानात भारताला विजय मिळाला होता.

अवश्य वाचा – पांड्याला मागे टाकत रोहित सरस, ‘हे’ १३ विक्रम भारताच्या नावावर

मालिकेत विजय मिळाल्यानंतरही रवी शास्त्री आपल्या संघातील खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावर पूर्णपणे समाधानी नाहीयेत. प्रत्येक खेळाडू अजुनही क्षेत्ररक्षणात आपली १०० टक्के कामगिरी बजावत नाहीये, यामुळे मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघ धावा काढतो. ही परिस्थिती बदलणं गरजेचं असल्याचंही रवी शास्त्री म्हणाले.

Story img Loader