Hardik Pandya will again captain Team India : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकणे अत्यंत दुर्दैवी मानले जात आहे. कारण त्याने २०२२ ते २०२४ दरम्यान अनेक वेळा संघाचे नेतृत्व केले होते. बीसीसीआय निवड समितीने २०२४ च्या टी-२० विश्वचषक जेतेपदानंतर निवृत्त होणाऱ्या रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका रिपोर्टनुसार, सूर्यकुमार आणि रोहितच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकचे कर्णधारपदी पुनरागमन होऊ शकते. सूर्यकुमार यादवने एकेकाळी आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, परंतु जेव्हापासून त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हापासून त्याचा फॉर्म घसरत गेला. गतवर्षी श्रीलंका दौऱ्यापूर्वी त्याने कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यापासून आतापर्यंत १४ डावांत त्याला केवळ २५८ धावा करता आल्या असून त्यात त्याची सरासरी केवळ १८.४२ इतकी आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मायदेशातील टी-२० मालिकेतही तो ५ डावात केवळ २८ धावा करू शकला, ज्यामध्ये त्याला दोनदा खातेही उघडता आले नाही.
हार्दिक पंड्या पुन्हा होणार कर्णधार –
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदावर परत येऊ शकतो. दैनिक जागरणच्या अहवालानुसार, नेतृत्वाच्या भूमिकेत त्याचे पुनरागमन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील संघाच्या कामगिरीवर अवलंबून असेल. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर रोहित शर्मा बॅटने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि कर्णधार म्हणून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकला नाही, तर हार्दिक पंड्या पुन्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत येऊ शकतो.
अशा परिस्थितीत सध्याच्या भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला बाजूला केले जाईल आणि अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल. दैनिक जागरणच्या अहवालात दावा केला आहे की, बीसीसीआय आणि गौतम गंभीरच्या काही प्रमुख लोकांचा असा विश्वास आहे की या अष्टपैलू खेळाडूवर खूप अन्याय झाला आहे. त्यामुळे त्याला टी-२० कर्णधार बनवण्याचे समर्थन करत आहेत.
निवडकर्त्यांना रोहितचे भविष्य जाणून घ्यायचे आहे –
इतकंच नाही तर, रिपोर्ट्सनुसार, निवडकर्त्यांना रोहित शर्माकडून त्याच्या भविष्याबद्दल आणि २०२५ नंतर करिअरबद्दल काय विचार करत आहे? ते जाणून घ्यायचं आहे. मात्र, त्याचे संपूर्ण भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून आहे. जर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर रोहित शर्मा २०२७ पर्यंत एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याचा विचार करू शकतो, अन्यथा हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय निवडकर्त्यांना आणि बीसीसीआयला घ्यावा लागेल.