श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार उपकर्णधार; धवन, पंतला वगळले
वृत्तसंस्था, मुंबई : श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला कर्णधार करण्यात आले असून, एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. निवड समितीने मंगळवारी जाहीर केलेल्या भारतीय संघात ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आले आहे. पुण्याच्या ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान मिळाले असून, गोलंदाजीत शिवम मावी, मुकेश कुमार, उमरान मलिक या नव्या चेहऱ्यांना पसंती मिळाली.
यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० साठी इशान किशन, तर एकदिवसीय मालिकेसाठी लोकेश राहुल आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला उपकर्णधार करण्यात आले आहे. शुभमन गिलला दोन्ही संघांत स्थान मिळाले आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या प्रमुख गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. अर्शदीप सिंग दोन्ही संघांत आहे. फिरकी गोलंदाजीसाठी ट्वेन्टी-२० मालिकेत वॉशिंग्टन सुंदर, युजर्वेद्र चहल, अक्षर पटेल यांना दोन्ही संघांत स्थान मिळाले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी यामध्ये कुलदीप यादवचे नाव जोडण्यात आले. विजय हजारे करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करण्याची पावती ऋतुराजला मिळाली. या स्पर्धेत ऋतुराजने सलग सात चेंडूंवर षटकार लगावले होते. या स्पर्धेत त्याने चार शतकांची नोंद आहे.
ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघ :
हार्दिक पंडय़ा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग