कप्तानीच्या पदार्पणात संघाला जेतेपद मिळून अष्टपैलू हार्दिक पंड्याला पुन्हा संघात आणण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्नशील आहे. सगळी समीकरणं जुळून आल्यास मुंबई इंडियन्सचा अनेक वर्ष अविभाज्य भाग असलेला हार्दिक पुन्हा संघाला बळकटी मिळवून देऊ शकतो. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं नशीब पालटवलं असं म्हटलं तर वावगं ठरु नये. कारण रोहितच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं आहे. स्पर्धेतल्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. कर्णधारपदाच्या जबाबदारीबरोबरीने फलंदाज म्हणूनही रोहितचं योगदान मोठं आहे. मात्र वय आणि आगामी काळ लक्षात घेता रोहितनंतरचा कर्णधार कोण याचा विचार मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन करताना दिसत आहे. रोहित आता ३६वर्षांचा आहे. सद्यस्थितीत तो भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी२० संघाचा कर्णधार आहे. साहजिकच ही अवघड जबाबदारी आहे. वय आणि दुखापती लक्षात घेता मुंबई इंडियन्सला रोहितनंतर संघाची कमान कोणाकडे याचा निर्णय काही वर्षात घ्यावा लागणार आहे.
आणखी वाचा: हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडे?
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स संघात असतानाच युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना लागेल तशी मदत केली आहे. संघाच्या लीडरशिप ग्रुपचा तो भाग राहिला आहे. मुंबई इंडियन्सनमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिकने गुजरात टायटन्स या सर्वस्वी नवीन संघाची मोट बांधली. पहिल्याच हंगामात हार्दिकने टायटन्स संघाला जेतेपद मिळवून दिलं. हार्दिकच्या नेतृत्वगुणांचं तेव्हा प्रचंड कौतुक झालं होतं. जिंकण्यातलं सातत्य कायम राखत टायटन्स संघाने यंदाच्या हंगामातही अंतिम फेरी गाठली मात्र चेन्नईने जेतेपदावर नाव कोरलं. कर्णधार, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा चारही आघाड्यांवर हार्दिकने स्वत:ला सिद्ध केलं आहे. हार्दिकसारखा सक्षम कर्णधार मिळाला तर मुंबईचा संघ आणखी मजबूत होऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या संघव्यवस्थापनाची, ध्येयधोरणांची तसंच खेळाडूंची हार्दिकला पुरेशी माहिती आहे. हार्दिक आता ३०वर्षांचा आहे. दुखापतीमुळे तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नव्हता. वर्ल्डकपदरम्यानही त्याला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकला नाही. दुखापतींची शक्यता बाजूला ठेवली तर हार्दिककडे नेतृत्व येणं साहजिक ठरु शकतं. भारताच्या ट्वेन्टी२० संघाचं नेतृत्वही हार्दिकने केलं आहे.
हार्दिकव्यतिरिक्त विचार केला तर मुंबई इंडियन्सच्या संघात कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे पर्याय आहेत. बुमराहने तर भारतीय संघाची कमानही सांभाळली आहे. पण दुखापतींची शक्यता लक्षात घेता एका वेगवान गोलंदाजावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल का हाही प्रश्न आहे. सूर्यकुमार सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी२० मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी हाताळतो आहे. सूर्यकुमार ३३ वर्षांचा आहे. फिट आहे. मुंबई इंडियन्स संघात स्थिरावला आहे. जागतिक ट्वेन्टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे नेतृत्वासाठी त्याच्या नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.
हार्दिकसाठी कोणाला सोडणार?
हार्दिक पंड्याला ताफ्यात दाखल करुन घेण्यासाठी मुंबई इंडियन्स तब्बल १५ कोटी रुपये खर्चणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तसं झाल्यास मुंबई इंडियन्स संघाला काही कटू निर्णय घ्यावे लागतील. २०२२ लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीनसाठी १७.५ कोटी रुपये खर्च केले होते. ग्रीन मुंबई इंडियन्ससाठी जरुर खेळला पण जेवढी प्रचंड रक्कम त्याच्यावर खर्च करण्यात आली त्यामानाने त्याची कामगिरी झाली नाही. त्यामुळे ग्रीनला सोडण्याचा निर्णय मुंबई घेऊ शकतं.
भारताचाच युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनसाठी मुंबईने १५.५ कोटींची बोली लावली होती. सलामीवीर आणि यष्टीरक्षक अशा दोन भूमिका इशान सांभाळतो. क्विंटन डी कॉकला रिलीज केल्यानंतर इशानच संघाचा मुख्य यष्टीरक्षक झाला. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध असल्यामुळे मुंबईने इशानवर एवढा विश्वास दाखवला. इशान मुंबई इंडियन्स संघाचा प्रदीर्घ काळासाठी भाग असू शकतो. इशानला रिलीज केल्यास बाकी संघ त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात.
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला मुंबईने मोठ्या आशाअपेक्षेने संघात समाविष्ट केलं होतं. पण दुखापतींमुळे आर्चर खेळूच शकला नाही. आर्चरसाठी मुंबईने ८ कोटी रुपये खर्च केले होते. आर्चरला सातत्याने दुखापतींनी सतवलं आहे. यामुळेच तो दोन विश्वचषक खेळू शकलेला नाही. त्याच्यावर विसंबून राहण्यापेक्षा मुंबई अन्य पर्यायांचा विचार करु शकतं.